
नांदेड। नांदेड जिल्हास्तरीय साहित्यिक व वयोवृद्ध कलावंतांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जि.प. नांदेड यांच्याकडून नियुक्त केली जाणारी मानधन निवड समिती बरखास्त करुन आठ ते दहा महिने झाले तरी अद्याप नव्याने ही समिती निवडण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध साहित्यिक आणि कलावंतांची परवड होत असून राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याविषयाकडे विशेष लक्ष घालून नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक व वयोवृद्ध कलावंतांची निवड समिती अभावी रखडलेले मानधनाचे प्रस्ताव मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाद्वारे बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे यांनी केली आहे.


संघटनेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना त्या सरकारने नांदेड जिल्ह्यातील साहित्यिक आणि वयोवृद्ध कलावंतांची निवड समिती गठीत केली होती. परंतु सत्ताबदल झाल्यानंतर भाजपा- शिवसेना (शिंदे गट) या युतीचे सरकार सत्तेवर येऊन ती निवड समिती बरखास्त केली. तेंव्हापासून नवी निवड समिती गठीत केली गेली नाही, त्यामुळे साहित्यिक व वयोवृद्ध कलावंतांचे सन २०२१- २२ आणि २०२२- २३ या दोन वर्षाचे मानधन निवडीचे प्रस्ताव जि.प. समाज कल्याण विभागात धुळखात पडून आहेत. त्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालून साहित्यिक, जेष्ठ कलावंतांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी बहुजन टायगर युवा फोर्स या संघटनेची मागणी आहे.


दिलेल्या निवेदनात हे देखील नमूद केले की, कोविड- १९ या जागतिक महामारीच्या दोन वर्षाच्या कालखंडात शासनाने प्रतिबंध घातल्यामुळे सण, उत्सव किंवा इतर सर्व सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली. परिणामी तेंव्हापासून मानधन नसल्याने साहित्यिक, कलावंतांची परवड सुरु असून निवड समिती केंव्हा गठीत होणार याविषयी निःसंदिग्धता असल्याने हा प्रश्न त्वरीत मार्गी लावून साहित्यिक व जेष्ठ कलावंतांचा सन्मान राखावा असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी जि.प. यांनाही देण्यात आल्या असल्याचे त्रिरत्नकुमार मा. भवरे यांनी सांगितले.


दरवर्षी प्रस्तावासाठी खर्च परवडत नाही
या संदर्भात बहुजन टायगर युवा फोर्सचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकार्यांनाही १९ एप्रिल रोजी एक पत्र दिले असून त्यात पत्रात साहित्यिक व वयोवृद्ध कलावंतांच्या मागील पात्रता यादीत पात्र असूनही मानधनासाठी निवड न झालेल्या वयोवृद्ध कलावंतांचे सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षाच्या यादीत समावेश करावा अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे अनेक कलावंत हे वयोवृद्ध असून सुद्धा आपले मानधनाचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जि.प. समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवित असतात. कोविड- १९ मुळे दोन वर्षे अनेक वयोवृद्धांची उपासमार झाली. ती परवड अजूनही सुरुच आहे. त्यात पुन्हा दरवर्षी प्रस्ताव दाखल करण्यासाठी करावा लागणारा खर्चही परवडत नसल्याने प्रत्येक वर्षी नवे प्रस्ताव सादर करण्याची अट शिथिल करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
