
नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा लढा होता. त्यांचा समतेचा विचार घरा-घरात नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.


कंधार तालुक्यातील बारूळ येथे रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शंकरराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक निरीक्षक पी.डी. भारती, सरपंच रंजनाताई आनंदा वन्नाळे, डॉ. योगेश दुलेवाड, संजय पाटील जाधव, रसूल खा पठाण, गजेंद्र टोम्पे उमेश राजभोज, भालचंद्र जोंधळे, डॉ. व्ही.जे आदमपूरकर आदींची मंचावर उपस्थिती होती.


पुढे ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे, मजुरांचे, प्रत्येक जातीतील स्त्रियांचे, ओबीसी तसेच प्रत्येक भारतीयांचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जाती-धर्मांच्या लोकांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करून त्यांचे विचार आंगी करावेत. समाजात आंबेडकरी विचारांची पेरणी करावी. स्त्रियांनी मुलांना शिक्षण देताना योग्य संस्कारमूल्य रुजवण्याची गरज आहे. युवकांनी देखील जयंतीला नाचण्यापेक्षा बाबासाहेब विचार अंगी रुजवावे असेही डॉ. राम वाघमारे म्हणाले. या कार्यक्रमाला जयंती मंडळाचे पदाधिकारी, बारूळ येथील प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

