Tuesday, June 6, 2023
Home नांदेड शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गिरीश महाजन -NNL

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गिरीश महाजन -NNL

· महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा · कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव

by nandednewslive
0 comment

नांदेड| निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आघात सहन करावे लागत आहेत. यातून शेतकरी बांधवांना कसे सावरता येईल याला शासनाने प्राधान्यक्रम दिला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मी स्वत: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती अनुभवली आहे. “सततचा पाऊस” ही अलिकडच्या काळात मोठी समस्या झाली आहे. निसर्गातील हे बदल लक्षात घेऊन सततचा पाऊस याला राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, गृहरक्षक दलाचे विजयकुमार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील 36 हजार 543 बाधित शेतकऱ्यांना आपण अवघ्या महिन्याच्या आत मदत उपलब्ध करून दिली. बाधित शेतकऱ्यांसाठी सुमारे 30 कोटी 52 लाख रुपये एवढा निधी शासनाकडे मागितला. एप्रिल महिन्यातच शासन निर्णयान्वये याला मंजुरीही देण्यात आली. सदर मदत बाधित शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात पुन्हा दिनांक 25 एप्रिल पासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागत आहे. या संकटातूनही शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला आपण दिले असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये आपण 8 लाख शेतकऱ्यांना 464.49 कोटी रुपये एवढी विमा रक्कम वाटप केली आहे. यात काही शेतकऱ्यांचे आधार व इतर तांत्रिक कारणांमुळे राहिलेले वाटप तेही पूर्ण केले जात आहे.

चालुक्यकालीन सर्कीट विकसित करणार
जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या आमाप संधी उपलब्ध आहेत. यादृष्टीने होट्टल, येरगी, करडखेडा हे चालुक्यकालीन सर्कीट म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे. याचबरोबर कंधार, राहेर, शिऊर, तामसा हे नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून चालना देवून गडकिल्ल्याच्या विकासासाठी यावर्षी काही निधीची तरतूद करण्यात येणार आहे. मोठ्या तीर्थक्षेत्रासमवेत ब आणि क वर्गातील तीर्थक्षेत्राचाही विकास व्हावा यासाठी तीर्थक्षेत्र-यात्रा स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सोई-सुविधा परिपूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत चालना देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पोलिस दलात उकृष्ट सेवेबद्ल पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र द्वारकादास गोविंदराव चिखलीकर, संभाजी रामराव शिवभक्त, आनंद मारोती बिचेवार, श्रीकांत माधवराव मोरे, शंकर नामदेवराव भोसले, मिलींद सिताराम बोडके, शिवसांब रामेश्वर मठपती, अशोक मनोहर वाव्हळे, श्रीराम तातेराव हमंद, संजय लक्ष्मण शिरगिरे, आनंद हंगरगे, किरण संभाजी अवचार मारोती भुजंगराव मुलगीर यांना देण्यात आले. यात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आदर्श तलाठी पुरस्कार किनवट तालुक्यातील जलधारा सज्जाचे अंकुर उल्हास सकवान यांना देण्यात आला.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजात स्त्रियांना समानतेने वागविणारे व माणूस म्हणून अधिकार जपणाऱ्या सुधारक पुरुषांचा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात संभाजी नामदेव मेटे, नाळेश्वर, संजय केरबा सोनकांबळे,बळीरामपूर, किशोर रघुनाथ आनकाडे , झेंडीगुडा यांचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने भगीरथी गोदावरी इंडस्ट्रीज नांदेड व आर.के. डॅडी फुड्स प्रोडक्टस नांदेड या दोन उद्योग घटकांना पुरस्कार देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्काऊट व गाईडच्या चळवळीत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या सन 2021-22 वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श स्काऊटर पुरस्कार स्काऊट मास्टर प्रलोभ कुलकर्णी यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. महिला व बाल क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज सेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार सौ. सुरेखा प्रकाशचंद पाटणी, सौ. विजया दत्तात्रय गोडघासे, श्रीमती पुरणशेट्टीवार व्यंकटलक्ष्मी नारायण, डॉ. सुरेखा अशोक कलंत्री यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सहाय्यक आयुक्त राज्यकर आयुक्त वस्तु व सेवाकर विभाग, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश वितरण करण्यात आले. तसेच यावेळी डाक विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आपली पेंशन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस उपअधिक्षक लक्ष्मण कसेकर यांनी केले पथसंचलनाचे नेतृत्व

परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक लक्ष्मण कसेकर आणि सेंकड इन परेड कमांडर राखीव पोलिस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांच्या नेतृत्वात केंद्रीय राखीव पोलिस दल मुदखेड, सशस्त्र पोलिस पथक, सशस्त्र पोलिस पथक (पुरूष) पोलिस मुख्यालय नांदेड, सशस्त्र महिला पोलिस पथक नांदेड, सशस्त्र पोलीस पथक ग्रामीण विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, पुरूष गृहरक्षक दल पथक, महिला गृहरक्षक दल पथक नांदेड, पोलिस बँड पथक, डॉग स्कॉड युनिट, बॉम्ब शोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन क्युआरटी वाहन, बुलेट रायडर, मिनी रेक्स्यु फायर टेंडर (देवदुत) हे पथसंचलनात सहभागी होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कवायतीचे निरिक्षण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!