
नांदेड। १ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्ताने एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील संघर्ष भवन सीटू कार्यालय येथे शिकागो (अमेरिका) आणि मुंबई च्या लढ्यात शहीद झालेल्या क्रांतिवीरांना क्रांतिकारी अभिवादन करून जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.


यावेळी सीटूचे जेष्ठ नेते कॉ. विजय गाभणे, जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार,जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी अभिवादन सभेस संबोधित केले. एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणून जगातील सर्व कामगार संघटना साजरा करतात. हा १३४ वा जागतिक कामगार दिन आहे.


याची सुरुवात अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांच्या आठ तास कामाच्या अधिकारासाठी जे आंदोलन झाले होते त्यामध्ये शकडो कामगारावर गोळीबार केला होता. कामगार नेत्यांना फासावर चढविण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षातील अखंड संघर्षानंतर एक मे १८८९ ला प्रस्ताव पारित करून कामगारांचा कामाचा तास,आठ तास ही कामगारांची मागणी मान्य करण्यात आली होती.सोबतच कामगारांचे सर्व अधिकार मान्य करण्यात आले होते.तो दिवस म्हणजेच एक मे जागतिक कामगार दिन म्हणून जगात साजरा केला जातो. त्या निमित्ताने शिकागो येथे शहीद झालेल्या क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले.


या वेळी महाराष्ट्र दिनाचे महत्व आणि संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षशील इतिहासाची मांडणी करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे कॉ.आण्णाभाऊ साठे,कॉ.अमर शेख, कॉ.गवाहणकर यांच्या संघर्षाचा आणि लढाऊ इतिहासाचा गौरव करण्यात आला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असावी आणि संयुक्त महाराष्ट्र असावा म्हणून लढणाऱ्या आणि त्या लढ्यात शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा जोतिबा फुलेंचा विजय असो, शहीद भगतसिंग अमर रहें, शहीद राजगुरू अमर रहें, शहीद सुखदेव अमर रहें, कॉ. आण्णाभाऊ साठे अमर रहें, कॉ. अमर शेख अमर रहें, कॉ. गव्हाणकर अमर रहें! आदी घोषणा देण्यात आल्याव. या कार्यक्रमात कॉ.विजय गाभणे,कॉ.उज्वला पडलवार, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.गंगाधर मेडकर, कॉ.कांताबाई तारू,कॉ. सुभाषचंद्र गजभारे,बेरूम शेख हुजूर,रेखाबाई गजभारे,कॉ. जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार कॉ.करवंदा गायकवाड यांनी मानले
