
केंद्रीय गृृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत भाजपाच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केली. त्या चर्चेत आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त प्रकाश वाहिन्यावर झळकले. अर्थात ही माहिती अधिकृत सूत्रांनी नाही तर सूत्रांनी दिल्याचेही बातम्यात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या बैठकीत नेमके काय ठरले हे सांगता येणार नाही. परंतु गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात बंद दाराआड केलेल्या चर्चातून पुढे भलतेच फलित निघते त्यामुळे या बातमीची दखल घेणे भाग आहे.


२०१९ च्या निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी मातोश्रीवर अशीच बंद दाराआड चर्चा केली. त्या चर्चेचा तपशील भेटीनंतर तात्काळ काहीच बाहेर आला नाही. आताच्या भेटीनंतर सूत्रांच्या हवाल्याने का होईना शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढवायच्या असे ठरल्याचे बाहेर आले. तेव्हाच्या बैठकीत तर काय ठरले हे कोणालाच कळले नाही. नंतर मातोश्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेने भलतेच वळण घेतले. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचे ठरले होते असे जाहीर करुन भाजप सोबतचा घरोबा तोडला. अमित शहा आणि भाजप नेत्यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगून ठाकरेंचा मुद्दा खोडून काढला. राज ठाकरे यांनीही या टीका केली. नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. अडीच वर्षानंतर ते सरकार नुसते कोसळले नाही तर शिवसेनेतही उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंना केवळ सरकार गमवावे लागले नाही तर पक्ष अाणि धनुष्यबाणही गमवावा लागला. एवढा हल्लकल्लोळ अमित शहा यांच्या एका बंद दाराआड चर्चेने केला. त्यामुळे त्यांच्या बंद दाराआड चर्चा भविष्यात काय वळण घेईल याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.


आता अमित शहा यांनी बंद दाराआड केलेल्या चर्चेचा तपशील खरा असेल तर त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. याचा पहिला अर्थ असा की, केंद्रीय पातळीवर महाराष्ट्राची कमांड आता अमित शहा यांच्या हातात आहे. महाराष्ट्रात जे निर्णय ते घेतील तोच अंतिम असेल. दुसरा महत्वाचा अर्थ असा निघतो की, २०२४ च्या निवडणुका जर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असतील आणि भाजप-सेना युतीला जर बहुमत मिळालेच तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल याची शास्वती नाही. याचे कारण असे की, शहा यांची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस नसतील अशी चर्चा भाजपातच आहे. परंतु पुढे काय परिस्थिती असेल यावर बरेच अवलंबून असेल. सध्या राज्यातील युती सरकारबाबत सर्वच स्तरातून साशंकता व्यक्त केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल असा सर्वांचा अंदाज आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरे यांचा जीव की प्राण आहे. मुंबई महापालिकेची रसद तोडली की उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या कमकुवत होतील याची जाणीव भाजप नेत्यांना आहे.


महापालिका जिंकायची झाल्यास एकनाथ शिंदे आणि त्यांना मिळालेला धनुष्यबाण जवळ असणे अत्याश्यक आहे. अशा परिस्थितीत एकमाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर आहे या चर्चांना पूर्ण विराम देण्यासाठीही अमित शहाच्या बैठकीतील निर्णय जाणीवपूर्वक बाहेर फोडण्यात आला असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर येऊन जवळपास नऊ महिन्याचा कालावधी झाला. अजूनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. त्यातूनच अजितदादा मुख्यमंत्री होणार या चर्चेचे पेव फुटले आहे. त्या चर्चांना पूर्ण विराम देण्याच्या उद्देशानेही बैठकीतील हा निर्णय मुद्दाम बाहेर काढण्यात आला असावा. राजकारणात कोणत्याच शक्यता नाकारता येत नाहीत.

एक गोष्ट खरी की, अमित शहा यांच्या बंद दाराआडच्या चर्चा महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळीच कलाटणी देतात. त्यातल्या त्यात शिवसेनेसोबत झालेल्या त्यांच्या चर्चेला नंतर वेगळे लागते हा इतिहास आहे. आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. त्यामुळे भविष्यात या चर्चेचा मुद्दा पुढे करुन राज्यात अजून चौथी महाविकास आघाडी तयार होते की, भाजप-सेना युती कायम राहते हे २०२४ मध्येच कळेल. अमित शहा यांची बंद दाराआड चर्चा कायमच चर्चेचा विषय राहिली हे मात्र खरे.

….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. १.५.२०२३, मो.नं. ७०२०३५८५११
