
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सिबदरा येथील दोन युवकांचा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे वडगाव येथील हनुमंत रायच्या मंदिरानजीक एका वाहनाच्या धडकेत अपघात होऊन जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा नांदेड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीबदरा येथील गोपाळ माधव बाचकलवाड व देविदास बालाजी गोसलवाड वय 25 वर्ष हे दोघे हिमायतनगर येथून सायंकाळी आपल्या सिबदरा गावाकडे मोटार सायकली वरून जात होते. दरम्यान दुचाकी मौजे वडगाव येथील हनुमंत रायच्या मंदिरानजीक जाताच दुचाकींचा महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाला जबर धडक बसली. यात गोपाळ माधव बाचकलवाड वय 42 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या देविदास बालाजी गोसलवाड यांच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेडला हलविण्यात आले होते.


दरम्यान त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले असून, दिवसागणिक अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो आहे. अपघातात या दोघाचा मृत्यू झाल्याने सीबदरा गावावर शोककळा पसरली आहे. दोघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या अपघात प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

