
तथागताच्या मार्गानेच देश महासत्ता होईल – डॉ. दिनेश निखाते -NNL
दर्जेदार बुद्ध - भीम गीतांनी बहरली बुद्धप्रभात

नांदेड। तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गावर मार्गक्रमण केल्यानेच देश आर्थिक महासत्ता होईल असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते डॉ. दिनेश निखाते यांनी बुद्ध प्रभात कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
एकनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बुद्ध प्रभात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नांदेड शहरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हा कार्यक्रम बुद्ध जयंतीच्या दिवशी संपन्न होत असतो. यावर्षी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रद्द करण्यात आला होता. म्हणून हा कार्यक्रम दिनांक 8 मे रोजी कै. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला होता.
दमदार बुद्ध आणि भीम गीतांनी बुद्ध प्रभात हा कार्यक्रम बहरला. अगदी कमी वेळात संयोजन समितीने या कार्यक्रमाची तयारी केली होती. प्रसिद्ध बुद्ध आणि भीम गीते यांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्रातील युवा गायक प्रशांत चित्ते यांनी गायलेल्या लाल दिव्याच्या गाडीला या गाण्याने कार्यक्रम सर्वोच्च शिगेला पोहोचला होता. ज्येष्ठ पत्रकार विजय निलंगेकर यांनी जाहली पहाट व प्रसिद्ध भीम गीत ओ बात करो पैदा या गाण्याने कार्यक्रमात रंगत आणली.
गायिका सोनाली बळेगावकर- शिंदे व वंदना हटकर यांनीही माता रमाईवर गायलेल्या गीताने सभागृह भारावून गेले होते. प्रसिद्ध गायक शेख इस्माईल भाई यांनी गायलेल्या दीक्षा आम्हा दिली भीमाने या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व विचारांना अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे , काँग्रेसचे युवा नेते डॉ. दिनेश निखाते यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. यावेळी ॲड. यशवंत मोरे यांच्यासह संयोजन समितीचे मुख्य संयोजक निहाल निलंगेकर , समितीचे अध्यक्ष श्याम कांबळे, सुनील कांबळे, दीपंकर बावस्कर, यशवंत थोरात यांची यावेळी उपस्थिती होती.