नांदेड। शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौर्यासाठी येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे नांदेड/हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी आज शिवसेना पदाधिकार्यांच्या बैठकीत दिली.
आज सकाळी मुंबईहून बबनराव थोरात यांचे नांदेड येथे आगमन झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता विश्रामगृहात शिवसेना पदाधिकार्यांची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, तब्बल वीस वर्षाच्या कालखंडानंतर शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. त्यांच्या नियोजित दौर्यानुसार १८ मे रोजी त्यांचे हैद्राबाद विमानतळावर आगमन होईल व सायंकाळी ८वाजता देगलूर येथे पोहंचतील. देगलूर येथे त्यांच्या नांदेड जिल्ह्यात आगमनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
त्यानंतर ते नांदेडकडे प्रयाण करतील. त्यावेळी नरसी, चंदासिंग कॉर्नर, देगलूर नाका येथे ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री त्यांचा नांदेड येथे मुक्काम असणार आहे. दि.१९ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या संपर्क कार्यालयात स्वागत करून सोनखेडकडे रवाना होतील व तेथे त्यांचा शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात येईल. त्यानंतर लोहा येथे सकाळी साडेदहा वाजता उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कर्हाळे यांच्या कार्यालयासमोर त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. लोह्यावरुन ११ वाजता कंधार येथे आयोजित पत्रकारांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व सिनेअभिनेत सयाजी शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. दि.१९ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नांदेड शहरात नांदेड जिल्हा शिवसेना पदाधिकारी मेळाव्यास ते उपस्थित राहतील व त्यानंतर त्यांचा शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम असेल. २० मे रोजी सकाळी सात वाजता शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील कार्यक्रमास ते नांदेडहून रवाना होतील. दुपारी २ वाजता केज येथे स्वागत व तेथील कार्यक्रम आटोपून ते सायंकाळी ५ वाजता बीड येथे पोहोचतील सायंकाळी ६ वाजता बीड येथे शिवसैनिक मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
रात्री छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील व तेथून विमानाने मुंबईकडे जातील. नांदेड येथे होणार्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यासंदर्भात त्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करुन हा मेळावा भव्यदिव्य होईल, याबाबतच्या सूचना थोरात यांनी दिल्या. तब्बल वीस वर्षानंतर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे नांदेड जिल्ह्यात आगमन होत असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु असल्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले. यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बबनराव बारसे, माधव पावडे, हिंगोली जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील,लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, जिल्हा संघटक नेताजी भोसले, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख तरोडेकर, शहरप्रमुख गौरव कोडगिरे, नरहरी वाघ, अशोक मोरे, जयवंत कदम, महेश पाटील, रामचंद्र रेड्डी, गणेश कुंटेवार, बाळासाहेब पाटील कर्हाळे, व्यंकोबा येडे, महेश खेडकर, नवज्योतसिंघ गाडीवाले, बळवंत तेलंग, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वत्सलाताई पुयड, अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, आजी, माजी लोकप्रतिनिधी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.