
नांदेड। विद्युत भवन मुख्य कार्यालयासमोर सीटू कामगार संघटनेच्या वतीने पीडित दलित शेतकरी कॉ.प्रभाकर दर्शनवाड यांनी आमरण उपोषण ;तर त्या उपोषणास पाठिंबा देत सीटूने बेमुदत धरणे आंदोलन गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आठवडाभर केले होते. अर्जदाराने ६ वर्षांपूर्वी भरले होते कृषी पंपासाठी कोटेशन,अजून वीज जोडणी नव्हती. तेव्हा ऍट्रॉसिटी व दफ्तर दिरंगाई कायद्या नुसार कारवाई करावी ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.


पीडित अर्जदार कॉ.प्रभाकर मोघाजी दर्शनवाड रा.मोहपुर ता.किनवट जि.नांदेड यांनी सन २०१६ मध्ये दि.१४ डिसेंबर रोजी मोहपूर ता.किनवट येथील शेतीमध्ये कृषी पंपासाठी रीतसर कोटेशन भरणा करून वीज जोडणीची मागणी केली होती.


परंतु त्यांना सहा वर्षे वीज जोडणी करून दिलेली नाही.ते सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या शेतातील वीज जोडणी करून,त्यांना झालेल्या मनस्तापाची व आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी तसेच ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व इतरांनी कॉ.दर्शनवाड यांची अडवणूक केली व त्रास दिला आहे. त्या सर्वांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार आणि दफ्तर दिरंगाई कायदा – २००५ नुसार कारवाई करावी म्हणून दि.१९ डिसेंबर पासून विद्युत भवन समोर कॉ.दर्शनवाड यांचे अमरण उपोषण आणि सीटू कामगार संघटनेच्या वतीने बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले होते.


पीडित शेतकऱ्यांस कोणते ना कोणते कारण सांगून वीज जोडणी देण्यासाठी जाणीवपूर्वक सहा वर्षे विलंब केला होता. अर्जदार कॉ.दर्शनवाड यांनी अखंड सहा वर्षे पाठपुरावा केला असून त्यांनी संबंधित वरिष्ठासोबत नऊ वेळा पत्रव्यवहार केला आहे. माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहिती नुसार शेत सर्वे नं.२०८ क्षेत्र १ हेक्टर २५ आर मध्ये कृषी पंप विद्युत जोडणीचे कोटेशन रुपये पाच हजार दोनशे भरणा केले असून सन २०१६ च्या मंजूर यादीमध्ये २६१ अनुक्रमांवर त्यांचे नाव आहे.तेव्हाची २७५ जणांची मंजूर यादी त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

अल्पभूदारक शेतकरी तथा असंघटित कामगार संघटनेचा पदाधिकारी उपोषणास बसला होता व सिटूच्या वतीने या उपोषणास पाठिंबा स्वरूपात बेमुदत धरणे सुरु केले होते. मुख्य अभियंता श्री डोके आणि अधीक्षक अभियंता श्री जाधव तसेच कार्यकारी अभियंता श्री चव्हाण यांनी तातडीने कारवाई करून वीज जोडणी करून देण्याचे आश्वासन सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांना दिल्यामुळे आठवडाभर चाललेले आंदोलन थांबवून विद्युत विभागास सीटूने सहकार्य केले होते.

सीटूच्या वतीने योग्य व अखंड पाठपुरावा केल्यामुळे सहावर्षांनी पीडित अर्जदारास शेतामध्ये वीज उपलब्ध झाली असून विशेष बाब स्वरूपात डीपी सुद्धा मिळाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये शेतात लाईट मिळवून दिल्याबद्दल दर्शनवाड कुटूंबायांनी सीटू आणि माकपचे आभार मानले असून दिलेला शब्द पाळल्याने सीटूने विद्युत विभाग तसेच मुख्य अभियंता श्री डोके,अधीक्षक अभियंता श्री जाधव आणि कार्यकरी अभियंता श्री चव्हाण यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत.

या यशस्वी आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, सीटूच्या जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार,अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड, असंघटितचे कार्याध्यक्ष कॉ.श्याम सरोदे,डिवायएफआयचे निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड, हॉकर्स युनियन चे अध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे,मजदूर युनियनचे कॉ.नागनाथ पवार आदींनी केले आहे.जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभणे यांनी योग्य मार्गदर्शन केले असून एका बैठकीत ते स्वतः उपस्थित होते.