
हदगाव/उमरखेड, शे चांदपाशा। खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परिवाराच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना घेण्यात आला. विक्रमी वेळेत हा कारखाना शेतकऱ्यांच्या सेवेत सुरु करण्यात आला. इतकेच नव्हे तर, स्वतःला साखर सम्राट म्हणून घेणाऱ्या कारखानदारांपेक्षा वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेततकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक २५०० इतका हमी दर देण्यात आला आणि म्हणूनच याच वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होईल असा खासदार हेमंत पाटील यांनी येथे विश्वास व्यक्त केला.


हदगाव येथील कस्तूरी मंगल कार्यालयात शनिवारी (दि.१३) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या भागात १६००० कोटी रुपये खर्चन ७ बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोबतच १६ पुलांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड, कळमनुरी या सहा तालुक्यातील ७५००० हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असून, बाजारपेठ एकमेकांशी जोडले जातील, शेतकऱ्यांना नेहमी छळणारा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. आजही अनेक शेतकऱ्यांचे पांदन रस्त्याचे प्रश्न, लाईट, नादुरुस्त डीपी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर लवकरच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन कायमचा तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले.


गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा हमी भाव मिळाला नाही. परंतु पहिल्यांदाच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना वसंत कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला २५०० रुपयाचा हमी भाव दिला. खासगी कारखानदारांच्या मक्तेदारीला चाप बसवण्यात आला असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी ऊस उत्पादक तज्ज्ञ शेतकरी सुरेश कबाडे यांनी ऊसाचा एक डोळा कटिंग करण्याची पद्धत, आकाशाच्या दिशेने डोळा ठेवणं, लागवड करताना ज्या बाजूने सुर्यप्रकाश जास्त त्या बाजूने डोळा कसा असावा, लागवड केल्याच्या दुसऱ्या दिवशी तन नाशकाचा वापर करण्याची पद्धत, खतांचा दुसरा डोस, शेंडा कटिंग पद्धत, जेठा मोडणे, शुक्ष्म अन्न द्रव्ये मिश्रण, नांगरणी या विषयावर तर, हवामान अभ्यास पंजाब डक यांनी वातावरण बदलामुळे शेतीवर होणारी परिणाम या विषयावर एकतास अतिशय रंजक अशी माहिती दिली. जवळपास सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकाच ठिकाणावर बसून शेतकरी हवामान आणि ऊस पिकावरील महत्वाचे मार्गदर्शन ऐकत होते.


यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजयराव देशमुख, सदाशिव पुंड, माजी जि. प.सदस्य संभाराव लांडगे, गोपालजी सारडा, माजी सभापती बालासाहेब कदम, माजी सभापती तुकाराम चव्हाण, युवासेना जिल्हा प्रमुख संदेश हडसणीकर, पांडुरंग मामा कदम, बबनराव माळोदे, संदीप पाटील तालंगकर, शिवाजी महाराज साप्तीकर, बाबुराव काळे, सुदर्शन पाटील, अभिनेता विनय देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
