
नांदेड। पुण्यश्लोक, लोकमाता, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने विसावा उद्यानाच्या जागेत बसवावा यासाठी महानगरपालिकेने वीस गुंठा जागा उपलब्ध करून द्यावी असा ठराव आज धनगर समाजाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट शिवाजीराव हाके उपस्थित होते.


पुण्यश्लोक, लोकमाता , राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव येथे 31 मे रोजी नांदेड शहरात मराठवाडा स्तरीय साजरा करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीची बैठक काँग्रेसचे बबन वाघमारे यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या आयोजनातून आज हॉटेल ताज पाटील येथे घेण्यात आली . या बैठकीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे .


नांदेड शहरात अहिल्यादेवींचा भव्य पुतळा उभारण्यात यावा या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. या बैठकीस एडवोकेट शिवाजीराव हाके, हरिभाऊ शेळके, प्राध्यापक आत्माराम वानोळे, प्रभाकर पेटे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे ,नरहरी कुंभारगावे, तुकाराम साठे, विमलताई पाटील, सोनटक्के, इंजिनियर बालाजी काळे, छत्रपती कानडे, सखाराम तुपेकर, भाऊराव पाटील, अशोकराव शेळके उद्धव माने, गोविंदराव गोरे, संतोष बारसे, हनुमंत डाके, नारायण लोंढे ,सुभाष पिसाळ , पांडुरंग पवार, दुर्गाजी होळकर, तुकाराम लोंढे, रामदास वाघमारे, व्यंकटराव साखरे, बालाजी होळकर ,टोपाजी काकडे ,बालाजी काकडे, बाळू पिसाळ, चांदु भामरे ,संतोष मेकाले, बालाजी काकडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


बैठकीच्या प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बैठकीचे प्रास्ताविक आयोजक बबन वाघमारे यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नांदेडमध्ये उभारण्यात यावे . अहिल्यादेवींची जयंती गाव ,वाडी तांड्यावर आणि नगरानगरात साजरी झाली पाहिजे. यासाठी सामाजिक एकजूट बनविणे आवश्यक आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या अनुषंगाने त्यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली.

या बैठकीत छत्रपती कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे ,प्रभाकर पेटे, हरिभाऊ शेळके, विमलताई पाटील, प्राध्यापक कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले .अध्यक्षिय समारोप करताना एडवोकेट शिवाजीराव हाके म्हणाले की, धनगर समाजाच्या तोंडाला आजपर्यंतच्या भाजपा सरकारने पाने पुसले आहेत. भाजप सरकारकडून धनगर समाजाला आरक्षणाच्या अनुषंगाने गाजर दाखविण्यात आले आहे . त्यामुळे आता धनगर समाजाला एसटी प्रवरातून आरक्षण मिळविण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती आंदोलन पुकारावे लागेल. एकजुटीने आणि एक दिलाने लढा उभारावा लागेल. त्यासाठी धनगर समाजाने आता तयारी ठेवायला हवी असे सांगतानाच ते म्हणाले.

नांदेड येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी काँग्रेसच्या युवा नेत्या प्रियंका गांधी आणि कर्नाटकाचे भावी मुख्यमंत्री सिद्धरामया यांना पाचारण करण्यात यावे यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा अशी चर्चाही यावेळी करण्यात आली. अशोकराव चव्हाण यांच्याच माध्यमातून नांदेड शहरांमध्ये महानगरपालिकेने अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी विसावा उद्यानाची कुसुम सभागृहासमोरील वीस गुंठे जागा द्यावी . तसा ठराव पारित करून पुतळा उभारणीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली . या बैठकीचे सूत्रसंचालन शिवाजीराव होळकर यांनी केले तर आभार एडवोकेट माणिक वाखरडे यांनी मांडले. या बैठकीला नांदेड ,हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
