Sunday, June 11, 2023
Home लेख वाढत्या उन्हामुळे मराठवाडा तापला -NNL

वाढत्या उन्हामुळे मराठवाडा तापला -NNL

by nandednewslive
0 comment

मराठवाड्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 41 अंशाच्या वर होते. वाढत्या उन्हामुळे मराठवाड्यात दुपारची वर्दळ कमी झाली आहे. आणखी आठ दिवस मराठवाड्यात उन्हाचे चटके बसणार असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. मागील चार दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढत आहे . दुपारी बारा ते सायंकाळी सहापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत . या उन्हाचा दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे.

दुपारी वाहतूक तर कमी झालीच आहे , परंतु रस्तेही सामसूम झाल्यामुळे सर्वत्र निर्मनुष्य वातावरण दिसत आहे .आठवडाभरातच तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी 40 अंश सेल्सिअस असे तापमान मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये होते . त्यानंतर मंगळवारी ,बुधवारी व गुरुवारी या तापमानात अधिक वाढ झाली. उन्हाचा तडाखा आणखी आठ दिवस राहण्याची शक्यता आहे . येत्या 17 मे पासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची पुन्हा एकदा शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यात सर्वत्र चक्रीवादळ तसेच अवकाळी पावसाने थैमान घातले होते. हळद व कांदा हे पीक काढणीसाठी आलेले असताना अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे हे नगदी पीक नुकसानीत गेले.

मराठवाड्यातील शेकडो शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हळद अवकाळी पावसामध्ये भिजुन गेली. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन सर्वाधिक होते. हिंगोलीच्या हळद बाजारात जवळपास 18 हजार कट्टे म्हणजेच 9000 क्विंटल हळदीची आवक झाली आहे . सरासरी पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भाव हळदीला मिळत आहे.पडत्या दरामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. मराठवाड्यात झालेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. आंबा, चिकू ही हाताला आलेली पिके अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे गळून पडली.
गेल्या आठ दिवसांमध्ये मराठवाड्यातील जलसाठा देखील कमी झाला आहे .

मराठवाड्यातील जल प्रकल्पांमधील साठा अवघ्या काही दिवसातच बर्‍याच अंशी कमी झाला आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये 38.60 % पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी मार्च ते मे दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली होती . फेब्रुवारी महिन्यातच पारा 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला . हा महिना आणि गेल्या 147 वर्षातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदल्या गेला. एप्रिल महिन्यातील काही दिवस उष्णतेचे होते . नंतर अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली.

पावसाळी ढग दूर होताच पुन्हा पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. वाढते उष्णतामान ,पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा वेग यावरून जलसाठ्याची कमालीची घट दिसून येत आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जण आपापल्या गावाकडे जाण्यासाठी घाई करत आहेत. मराठवाड्यातील सर्वच बसस्थानकांवर सध्या गर्दी आहे. शुक्रवारी उन्हाचा पारा 42 अंश झाला होता , परंतु गावाकडची ओढ लागलेल्या मंडळींनी बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावरही गर्दी केली होती. बसमध्ये जागा पकडण्यासाठी कुणी पिशव्या तर कोणी खिडकीतून सीट पकडण्यासाठी शिरण्याचा प्रयत्न करत होते. बसस्थानकाचा परिसर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दीने गजबजून जात आहे.

अवर्षणप्रवण मराठवाड्यात शेतीच्या उत्पादनात दुष्काळामुळे घसरण होते. या परिस्थितीत शेतकर्‍यांचे अर्थकारण टिकून ठेवण्यासाठी कोरडवाहू फळ पिकांची लागवड करण्याचा पर्याय कृषी शास्त्रज्ञांनी सुचविला आहे. शेताच्या बांधावर किंवा वापरात नसलेल्या जमिनीत फळझाडे लावणे शक्य आहे. कमी पाण्यात आणि खर्चात तीन वर्षात निश्चित उत्पन्न सुरू होणार्‍या चिंच , कवट, बोर, जांभूळ या फळपिकांची शिफारस करण्यात आली आहे . मराठवाड्यात मागील काही वर्षांपासून कोरडवाहू फळ पिकांबाबत जनजागृती करण्यात आली आहे . त्यामुळे लागवडीचे प्रमाण देखील वाढले आहे. यावर्षी मराठवाड्यात चिंचेचे लक्षणीय उत्पादन झाले आहे. नवीन चिंच देखील बाजारपेठेत दाखल झाली आहे . दर्जानुसार तिला बाजार भाव मिळत आहे .

सध्या मराठवाड्यातील चिंच 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने विकत आहे. दैनंदिन आहारात चिंचेचा वापर वाढला आहे. याबरोबरच शीतपेय, सरबत आणि सॉससाठी चिंच वापरण्यात येत आहे . विदेशी बाजारपेठेतही चिंचेला मोठी मागणी आहे. त्यामुळे मराठवाड्यात चिंच लागवडीवर भर देण्यात आला आहे. मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला असून शनिवारी छत्रपती संभाजी नगरचे तापमान 41 अंश सेल्सिअस तर जालना येथील तापमान 42.2 परभणीचे तापमान 43 .2 नांदेड चे तापमान 42 .8 हिंगोली चे तापमान 42.1 बीडचे तापमान 41.3 धाराशिवचे तापमान 40.2 तर लातूरचे तापमान 40.4 एवढे नोंदल्या गेले. वाढत्या तापमानामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.

मराठवाड्यात उष्णतेचा पारा वाढल्याने शेतकरी व शेतमजूर दुपारी उन्हात जाण्यापासून घाबरत आहेत. मराठवाडा हा उजाड, डोंगराळ माळराणाचा भाग असल्याने भौगोलिक रचनेनुसार मराठवाड्यात दरवर्षी उन्हाळ्याची तिव्रता इतर भागांपेक्षा अधिक जाणवते. सिंचनाचे अत्यल्प प्रमाण, सततची वृक्षतोड, राष्ट्रीय महामार्गावर सिंमेटच्या रस्त्याची होत असलेली बांधणी व वाढत्या बांधकांमामुळे उष्णतेची तिव्रता मराठवाड्यात वाढत आहे. उन्हाची तिव्रता लक्षात घेवून अनेकजण आईस्क्रीम, शितपेय व ज्यूसचा आस्वाद घेत आहेत.

सर्दी, खोकला या सारखे आजार होऊ नयेत म्हणून अनेकजण हे खाणे व पिणे टाळत आहेत. ज्यूससाठी फळांची मागणी वाढल्याने फळाचे दरही वाढले आहेत. लिंबाचा दरही वाढल्याने गृहीणी त्रस्त आहेत. वाढत्या उष्णतेचा परिणाम लग्नसराईत देखील दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या लग्नात मंडप सुद्धा रिकामे दिसत आहेत. ग्रामीण व शहरी भागात थंड पाणी, कैरीचे पन्हे, कोकम शरबत या बरोबरच पारंपरिकता ताक, अंबील, मठ्ठा याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे डोके दुखणे, बी.पी.वाढणे, घबराट होणे, अंग दुखी असे आजारही वाढले आहेत. आधीच कोरेानाच्या आजाराने भेदरलेले रुग्ण वाढत्या उष्णतेमुळे परेशान दिसून येत आहेत. मराठवाड्यातील शेतकर्‍यांवर मात्र अगोदरच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नैसर्गिक संकट निर्माण झाले होते. आता वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाच्या संकटासमोर बळीराजांनी हात टेकले आहेत.

…डॉ. अभयकुमार दांडगे, नांदेड. मराठवाडा वार्तापत्र,,,, abhaydandage@gmail.com

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!