
हिमायतनगर। शहरातील उमरचौक मधुन पार्डीकडे जाणाऱ्या रोडवर डॉ. भिशीकर व सुपर बीज भांडार यांच्या भुसार दुकानासमोर दुर्गंधीयुक्त नालीचे पाणी रस्त्यावर साचुन ये-जा करणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरीकांमध्ये आरोग्याच्या समस्येला घेवुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायत अंतर्गत या क्षेत्रातील काही ठिकाणी गटारींचे बांधकाम झाले नसल्याने दुर्गंधी युक्त पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात व मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत परिसरातील नागरीकांतुन नगर पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे.


या संदर्भातील वृत्त असे की, हिमायतनगर नगर पंचायतच्या कार्यक्षेत्रातील उमर चौकातील वार्ड क्रं १५ व वार्ड क्रं १६ या दोन वार्डाच्या मधुन पार्डी, फुलेनगर,टेंभी, आंदेगावकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. याच मुख्य रस्त्यावर डॉ.भिशीकर यांचा दवाखाना आहे. दवाखाण्यात येणाऱ्या पेशंट सह नातेवाईकांना या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.समोरील मोकळ्या जागेवर अनेक वर्षापासुन गटारीचे काम झाले नसल्याने त्या ठीकाणी दुर्गंधीचे घाण सांडपाणी जमा झाले असुन, या परिसरात डांसाचा उपद्रव वाढल्याने नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबातील आरोग्याच्या दृष्टीने भितीचे सावट पसरले आहे.


याबाबत हिमायतनगर नगरपंचायत परीसरातील नागरीकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील नगरपंचायत प्रशासनाकडुन थातूरमातुर नाल्या काढण्याव्यतिरिक्त कुठलेही कार्य झाले नसल्याची ओरड या ठीकाणच्या रहीवाशियाची आहे. उन्हाळा असुन सुद्धा शहरात हि परिस्थिती आहे. पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे.शहरातील कामाचे अवकाळी पावसाने पितळ उघडे पडुन सुध्दा नगर पंचायत प्रशासनास जाग आली नाही. नगर पंचायत प्रशासनाने झोपेतून उठुन साफ सफाई करून नागरीकांना होणारा त्रास कमी करावा अशी ओरड सामान्य जनतेतुन होत आहे.

