
नांदेड| दिवसेंदिवस तापमापन वाढत चालले आहे. या वाढत्या उन्हाचा तडाखा माणसाबरोबरच चिमण्या पाखरांनाही बसतो आहे. अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त झाले आहे. मे महिन्याच्या मध्यात ही परिस्थिती असून पुढील काही दिवसांत उष्णतेचा पारा चढता राहण्याची शक्यता आहे.


ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली असून याची झळ मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. अशा परिस्थितीत पाण्यावाचून विव्हळणाऱ्या चिमण्या पाखरांनाही शहरातील तरोड कॅनाल रोड परिसरात वृत्तपत्र विक्रेते बाबुराव थोरात यांच्या घरासमोर झाडांवर काही चिमुकल्यांनी छोट्या छोट्या द्रोणांमध्ये तसेच शहाळ्याच्या करवंट्यांत पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


उन्हाळयात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहेत. आता सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. अशावेळी सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन दिले जाते. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, बाबुराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शुभ्रा भगत, जितेंद्र लोणे, वैभव भगत, थोरात बंधू, ललिता थोरात, भारतबाई थोरात, माया थोरात, जयंती ढवळे, युवराज ढवळे यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.


आजच्या धावपळीच्या आणि आॅनलाईनच्या जमान्यात मोबाईलसोबत मनुष्य एकाकी जीवन जगत आहे. पशू, पक्षी मात्र सोबत आनंदाने जगताना दिसत आहेत. परंतु उन्हाळ्यात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, शहाळ्याच्या करवंट्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवाट्या तयार करून त्या झाडांना बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या वाटेवरून येता, जाता पक्ष्यांना पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.

….. आणि लाल बुडाच्या बुलबुल पक्षाने बांधले घरटे….!
अवकाळी पावसानंतर वाढत्या उन्हाचा प्रकोप लक्षात घेता इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या शुभ्रा भगत या मुलीने घरासमोरील पेरुच्या झाडावर तसेच जांभळीच्या, लिंबोणीच्या आणि आंब्याच्या झाडांवर चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय केली आहे. सुरुवातीला ती सरंक्षक भिंतीवर पाणी आणि दाणे ठेवत असे. मग तिनेच तयार केलेल्या पाणवाट्यांमध्ये दररोज नियमितपणे पाणी टाकून ते झाडांच्या फांद्यांना बांधले आणि ज्वारी, गहू किंवा तांदळाचे दाणे घराच्या संरक्षक भिंतीवर ठेवण्यास सुरुवात केली. एके दिवशी लाल बुडाच्या बुलबुल पक्षाने अंडी घालण्यासाठी पेरुच्या झाडाची निवड केली. झाडाच्या एका फांदीवर आपले बस्तान बसवून घरटे बांधण्यास सुरुवात केली. आता त्या घरट्यात दोन लहानशी पिल्ले चिवचिवत असून बच्चे कंपनीला प्रचंड आनंद होत आहे.
