Sunday, May 28, 2023
Home कृषी आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा -NNL

आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा -NNL

by nandednewslive
0 comment

जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात होत असून, घरगुती सोयाबिन बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांचा बरेचदा असा समज असतो की, प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी. परंतु सोयाबिन, मुग, उडीद, चवळी, हरभरा भूईमुग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्यामुळे कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. यामुळे सरळ वाणाचे बियाणे विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारी बियाणे आपण पुढील दोन वर्ष बियाणे म्हणून वापरु शकतो. त्यामुळे दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे न उगवल्यामुळे पेरणीकरिता वापरलेली खते, मनुष्यबळ इत्यादी वाया जाते. शिवाय लेखी, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका होण्याची शक्यता असते. यात शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. खाजगी कंपनीचे बियाणे विकत घेतले असले तरी शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे हितावह आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील सोयाबिन शिल्लक असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या सोयाबिनची घरीच साध्या सोप्या पध्दतीने उगवण तपासणी केली तर खर्चात बरीच बचत होईल. तसेच फसवणूकही टाळता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती उगवण तपासणी करुनच या हंगामात घरचेच सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करण्यासाठी सोप्या पध्दती आहेत.

गोणपाट वापरुन उगवण क्षमता तपासणी
गोणपाट पध्दतीमध्ये बियाणांचा प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. यानंतर सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुऊन घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट शंभर दाणे मोजून दीड ते दोन से.मी. अंतरावर दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे. अशा प्रकारे शंभर दाण्यांचे तीन नमुने तयार करावे. गोणपाटावर पाणी शिंपडून ओले करावे. बियाणांवर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा पाणी शिंपडावे. गोणपाटांच्या तुकड्यांची बियाणांसकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. यानंतर सहा-सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजा. तीनही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभरपैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाणांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजता येईल. परंतु जर उगवण झालेल्या बियाणांची सरासरी संख्या सत्तरपेक्षा कमी असेल तर एकरी बियाणांचे प्रमाण वाढवून पेरणी करावी. तसेच पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

वर्तमानपत्राचा कागद वापरुन उगवण क्षमता तपासणी
वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात. यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा पध्दतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावेत.

पाण्यात भिजवून उगवण क्षमता तपासणी
बियाणांच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. त्या नमुन्यात शंभर दाणे मोजून वेगळे काढा. असे शंभर दाण्यांचे तीन संच तयार करावे. शक्यतोवर काचेच्या तीन पेल्यात पाणी घेऊन त्यात हे दाणे टाकावे. पाच ते सहा मिनीट ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकून देऊन दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णत: फुगलेले तसेच बियाण्यांच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. यामध्ये दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्यावी. जो दाणा पाच ते सहा मिनिट पाण्यात ठेवल्यावर फुगतो तो पेरणीसाठी अयोग्य समजावा. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबूत असल्यामुळे त्यात पाणी आत शिरत नाही. फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरुकुत्या पडल्यासारख्या दिसतात. यामुळे शंभर दाण्यापैकी जरी सरासरी सत्तर किंवा जास्त दाणे अशा प्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यांसारखे गुणवत्तेचे आहेत, असे समजावे.

शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासल्यानंतरच बियाण्यांची पेरणी करावी. उगवण क्षमता सत्तरपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा पध्दतीने उगवण क्षमता तपासणी केल्यानंतर बियाणे पेरल्यास शेतकऱ्याचे वेळ आणि श्रम दोन्ही वाचेल.

लेखक …….माहिती अधिकारी, अपर्णा यावलकर, अमरावती

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!