
त्र्यंबकेश्वर येथील घटनेने सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महादेवाला चादर चढविण्यासाठी काही मुस्लीम नागरिकांनी देवळात घुसण्याचा प्रयत्न केला असा एक आरोप आहे. दुसरीकडे ही परंपरा अत्यंत जुनी असल्याचा दावा मुस्लीम धर्मियांकडून केला जात आहे. यामध्ये नेमके काय घडले हे एसआयटीच्या तपासात पुढे येईलच. परंतु एक गोष्ट मान्य केली पाहिजेत की हिंदू-मुस्लीमांच्या अशा परंपरा महाराष्ट्रात अनेक जागी आहेत. त्याबाबत दोन्ही धर्मियांमध्ये कोणालाही तक्रार नाही. सामाजिक सौहार्दासाठी धार्मिक एकता महत्वाची असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे.


मी गेली जवळपास ४३ वर्षे मी पत्रकारितेत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या अनेक बातम्या मी दिल्या आहेत. एवढेच नाही तर पत्रकारितेत येण्यापूर्वी अगदी समज आली त्या वयापासून या परंपरा मी जवळूनही पाहिल्या आहेत. माझे गाव असलेल्या उमरखेडात संत आईनाथ महाराजांचे मंदिर आहे. आईनाथ महाराजांचे असंख्य भक्त आहेत. हे संत उमरखेडचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या मंदिराचा वार्षिक उत्सव दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरु होतो. हा उत्सव सुरु होण्यापूर्वी दरवर्षी आईनाथ महाराजांच्या वतीने उमरखेडच्या आठवडी बाजारात असलेल्या तातारशहा बाबाला गलप पाठविला जातो. (ज्याला चादर चढविणे असे म्हटले जाते.) हा गलप पाठविल्याशिवाय उत्सवाला प्रारंभच होत नाही. ही परंपरा गेल्या दोन अडीचशे वर्षापासून अखंड सुरु आहे.


संत आईनाथ महाराज व तातारशहा बाबा हे अत्यंत घनिष्ट मित्र होते. त्यामुळे ही परंपरा अजूनही सुरु आहे. दुसरी घटना माझ्या मामाच्या घरातील, माझ्या सासरवाडीची आहे. माझ्या मामाचे कुलदैवत माहूरची रेणुका माता आहे. चांदखानबाबा म्हणून अनसिंगला एक संत होऊन गेले. त्यांचाही मान मामाच्या घरी केला जातो. घरात जेव्हा एखादे लग्न कार्य केले जाते. तेव्हा परळाची पूजा होते. त्या परळच्या पुजेत इतर देवतांच्या नैवेद्याच्या पात्रासोबत चांदखान बाबाचाही नैवेद्य असतो. एक मुस्लीम धर्मिय त्या दिवशी इतर ब्राम्हणांसोबत जेवायला बसवावा लागतो. ती परंपरा आजही सुरु आहे. अगदी लहान वयापासून मी या परंपरा पहात आलो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उमरखेडात अमानुल्ला जहागीरदार, अलिमोद्दीन काझी अशा नामवंत मुस्लीम घराण्यांशी माझा अत्यंत निकटचा संबंध राहिला. वहाब काझी, अखिल काझी त्यांची सर्व भावंड यांचे माझ्या घरी व माझे त्यांच्या घरी सतत जाणे-येणे असायचे. नुसते जाणे येणे नाही मी त्यांच्या घरात गेलो तर त्यांच्या घरातील सर्व महिला मला अत्यंत प्रेमाने, आपुलकीने बोलायच्या.


कोणताही संकोच त्यांच्यात नव्हता. अखिल काझी यांचे बंधु सलिम काझी यांचे लग्न तर आम्ही सर्व मित्र मंडळींनी अगदी हिंदू पद्धतीने म्हणजे जेवणाच्या पंगती उठवून केले. केवळ लग्न लावण्याचा धार्मिक विधी त्यांच्या पद्धतीने झाला. जेवणाचा सर्व बेत अगदी हिंदूच काय ब्राम्हणी पद्धतीने केला. बुंदीचे लाडू हा लग्नातील खास पदार्थ होता. त्या लग्नाला आलेल्या सर्व मुस्लीम बांधवांनी त्याचा चांगला आस्वाद घेतला. आजही ही मित्र मंडळी माझ्याशी तेवढ्याच प्रेमाने व आपुलकीने राहतात. त्यांची जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा मित्र भेटल्याचा आनंद होतो. कोणी मुस्लीम भेटला अशी भावना मनाला शिवत देखील नाही. उमरखेडात गणपती उत्सवाप्रमाणे सवारीही मोठ्या प्रमाणात बसत असत. अनेक हिंदू देखील त्या सवाऱ्यांना नवस बोलत. नवस पूर्ण झाला की सवारीला घरी बोलावून नवस फेडत. अनेक सवाऱ्यांचा पैशाचा कारभार हिंदूच्या हाती असे. हिंदू मुस्लीम सवारीच्या मिरवणुकीत तेवढ्याच श्रद्धेने व उत्साहाने सहभागी होत. हे चित्र मी बालपणापासून पहात आलो.

पत्रकारिते आल्यानंतर हिंदू-मुस्लीम एेक्याचा अशा बातम्या मी राष्ट्रीय ऐक्याचे प्रतिक म्हणूनही केल्या. ईटीव्हीत असताना नवरात्रात मी माहूरगडावर गेलो असताना तेथे दर्शनासाठी आलेल्या मुस्लीम दांम्पत्यांची मी मुलाखत घेतली. ते दरवर्षी नवरात्रात माहूरगडावर दर्शनाला येतात असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर माझा मुलगा जगदंबेच्या कृपेने झाला असेही त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात पेनूर नावाचे गाव आहे. त्या गावात दरवर्षी श्रावण महिन्यात दर्ग्यात पोथी वाचन होते.

शेकडो भाविक ती पोथी ऐकण्यासाठी दर्ग्यात येतात. श्रावण महिन्याच्या शेवटी पोथीची समाप्ती केली जाते. तेव्हा गावातील नव्हे तर पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लीम भाविक मोठा भंडारा करतात. शिर्डीचे साई मंदिर तर हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिकच मानले जाते. तेथे दोन्ही धर्मिय दर्शनाला येतात. प्रत्येक जिल्ह्यात अशा विविध धर्मातील एकोपा सांगणाऱ्या घटना घडतात.

समाजातील वातावरण सौहार्दाचे रहावे, समाजात शांती नांदावी त्यासाठी धार्मिक सौहार्द अत्यंत महत्वाचे आहे. परंतु दुर्देवाने राजकारणाने हा धार्मिक एकोपाच सध्या धोक्यात आला. त्यासाठी दोन्ही कडील कट्टरतावादी दोषी आहेत. गणेशोत्सव असो की ईद असो त्याची चिंता पुजारी किंवा मौलवीपेक्षा पोलिसांनाच अधिक असते. सर्वसामान्य लोकांना याच्याशी घेणे देेणे नसते. परंतु सामान्य लोकांच्या मनावर हे सातत्याने बिंबवले जाते. कोणताही धर्म वाईट करायला, हिंसाचार करायला सांगत नाही. सर्व धर्माची शिकवण ही शांतता, अहिंसा अशीच आहे. परंतु एकदा का राजकारणात धर्म घुसला की सामाजिक सौहार्द, बंधुभाव, एकता या सर्व सकारात्मक गोष्टींना तिलांजली मिळून फक्त सत्ता हेच साध्य ठरते.
्प्रेमात, युद्धात व राजकारणात सर्व काही क्षम्य असते हा नियम लावून मग सर्व जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. त्यात समाज व सामान्य नागरिक होरपळून निघतो याचे कोणाला भानही नसते. या देशाला जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर अशा घटनातून बाहेर पडले पाहिजेत. धर्म ही खाजगी बाब आहे. ती आपल्या परीने घरात जरुर पाळावी. परंतु समाजात सर्वजण भारतीय आहोत ही भावना जोपर्यत मनामनात रुजविली जात नाही तोपर्यत भारत जगात महासत्ता म्हणून ताठ उभा राहणार नाही.
….लेखक…..विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. १७.५.२०२३, मो.नं. ७०२०३५८५११