
लोहा| लोहा नगर पालिका वार्ड सात मध्ये रस्ते व नाली च्या बांधकामासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. त्या कामाचा तपशीलवार माहिती समोर आल्या नंतर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नगरसेवक शरद पाटील पवार व राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे लोहा तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार या माजी आजी मुख्यमंत्री समर्थकांनी ५ कोटींचा निधी आपणच मंजूर करून आणला आहे असा दावा केला. या दोघांत श्रेयाची खेचाखेची सुरू असतानाच तिसऱ्यानेच लोण्याचा गोळा उचलला आहे.सोशल मीडियात या दोन्ही पवारांच्या समर्थकांत कमेंट युद्ध सुरू आहे.


लोहा नगर पालिकेच्या मुदत संपायला अवघी सहा महिने बाकी आहेत.उर्वरित काळात विकासा कामे घाई घाईने कामाच्या निविधा प्रकाशित केल्या आहेत. तर दुसरीकडे शहरातील वार्ड 7 पवार गल्ली, भोईवाडा व विस्तारित वस्ती या भागात रस्ते व नाली बांधकाम करणे यासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आपण सात कोटी रुपयांच्या विकास कामांसाठी मंत्रालयात पाठपुरावा केला. आणि आता मागील दोन महिन्यात ते मार्गी लागले हा निधी रद्द करण्यासाठी नगराध्यक्ष व त्याच्या काही सोबत्यांनी मंत्रालयात जाऊन खूप खटाटोप केला. पण काही फरक पडला नाही. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आ राजूरकर यांची मोठी मदत झाली. त्यामुळेच पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी सांगितले. हा निधी आपण मंजूर करून आणला असे निक्षून सांगत आहेत त्याच्या समर्थकांनी सोशल मीडियात तसे जाहीर केले आहे.


राज्यातील शिवसेना सत्ताधारी पक्षाचे लोहा तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी पाच कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून आणला आहे. राज्यात आमचे सरकार आहे. संपर्क प्रमुख आनंदराव पाटील यांच्य माध्यमातून थेट मुख्यमंत्री याना आम्ही भेटलो नगर विकास खाते त्याच्या कडे आहे.पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि हा निधी उपलब्ध झाला. सता आमची…. मुख्यमंत्री आमचे आहेत. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसा निधी मिळेल (?) प्राधान्य तर शिवसेना भाजपा पक्ष पदाधिकारी यांनाच आहे. त्यामुळे हा निधी आपण मंजूर करून आणला असा दावा शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी केला.


शहरात वार्ड सात साठी पाच कोटी विकास निधी मंजूर झाल्याचे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. मिलिंद पवार व शरद पाटील यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोघांचे समर्थक पोस्ट टाकत आहेत. तर तिसऱ्यानेच हा लोण्याचा गोळा नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केला अशी चर्चा सुरू आहे. या दोन पवारांच्या वादात मात्र लोण्याचा गोळा दुसऱ्यानेच पळविला (?) असे ऐकन्यात येते आहे. पण शरद पाटील कधी काय करतील (?) याचा नेम नाही त्याची कल्पकता भारी पडू शकते.

तर राज्यातील सत्ताधारी पक्षाचे म्हणजे शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार हे सुद्धा वरिष्ठ पातळीचा वापर करू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे तालुकाप्रमुख मिलिंद पवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पवार या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांत पाच कोटी रुपयांच्या विकास निधी भरून जोरदार जुंपली आहे. फिरता राजकीय मंच पूर्ण करणाऱ्याचे फावते की काय अशी शंकाकुशंका सुरू असतानाच पवार विरुद्ध पवार असा आणखी एक सामना आता लोह्याच्या राजकीय रंग मंचावर सुरू झाला आहे.
