
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। एवढ्या छोट्या कामाला १८ महिने कसे लागतात हेच मला कळले नसून मी दिल्ली- मुंबई हायवेचे १ लाख कोटीची काम दोन वर्षात पूर्ण केले तेव्हा ५१ कोटीच्या सदर स्काय वॉकचे काम करण्यास १८ महिने कशाला दिले हे मला समजले नाही. हे वर्षभरात पूर्ण करा मी एक वर्षाने मातेच्या दर्शनासाठी पुन्हा येईन तेव्हा स्काय वाकने गडावर जाईन असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दि.२० मे. रोजी माहूर येथे केले.येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयाच्या लिफ्टसह स्काय वॉकचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर हे होते. प्रमुख अतिथी खा. हेमंत पाटील, आ.भीमराव केराम, आ.मदन येरावार, आ.तुषार राठोड, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.नामदेव ससाणे, आ.राम पाटील रातोळीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, श्याम भारती महाराज, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक गोपू महामुने. अनिल वाघमारे.ॲ,रमन जायभाय.ॲ.दिनेश येउतकर.जिवन अग्रवाल.हर्ष दिक्षीत, यांची उपस्थिती होती.


यावेळी भव्य मंचावर स्काय वॉकचे ना. गडकरी यांच्या हस्ते ई- भूमिपूजन व कोनशिलाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. भीमराव केराम रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष नागेश न्हावकर, खा.हेमंत पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलतांना ना. गडकरी म्हणाले की, सदर कामाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असून कोणतीही अडचण राहिलेली नाही त्यामध्ये वनविभागाची महत्वाची असलेली संमती सुद्धा झालेली आहे. एक वर्षात काम पूर्ण केल्यास देशभरात १ लाख २५ हजार कोटीचे २६० रोपवे केबल तारची १०० कामे प्रस्तावित असून, त्यापैकी काही कामे तुम्हाला देईन व प्रमाणपत्र देईन व सत्कार करीन १८ महीण्याचे हे काम १२ महीण्यात पुर्ण करा असे कंत्राटदारास उद्देशून सांगितले.


तसेच दक्षिणा घेणाऱ्यापैकी आम्ही नाही. तेव्हा बिगारभरती काम केले तर याद रखा काम व्यवस्थित झाले नाही तर रगडल्याशिवाय राहणार नाही असा दम सुद्धा जाहीरपणे दिला. पूर्वी मला नागपूर ते माहूर यायचे झाले तर ८ तास वेळ लागत होता. राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर प्रथमच मी आज या रस्त्याने प्रवास करून नागपूर ते माहूर प्रवास केवळ अडीच तासात पूर्ण करून माहूरगड येथे पोहचलो याचा आज मला अतिशय आनंद झाला असे सांगून माझ्या हातून आणखीही विकास कामे व्हावे यासाठी आई रेणुकामातेकडे निरोगी आयुष्य देण्याचे साकडे घातले असल्याचे सांगितले.

यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध रस्ते व पुलाकरिता १७६५ कोटी रुपये निधीची घोषणा केली. प्रस्तावित कामे रावी ते देगलूर ३१ कि.मी ३०० कोटी, आदमपूरफाटा ते सगरोळी २२ कि.मी. २३० कोटी फुलसांवगी ते माहूर ३० कि.मी. ३५० कोटी, लोहा ते गंगाखेड रस्ता सुधारणा ४२कि.मी ४२५, कोटी, भोकर शहर बायपास फ्लाय ओव्हर १०० कोटी, कुंद्राळा ते वझर १६१ च्या ५ कि.मी. ७ कोटी, उदगीर ते रावी २६.५ किमी साठी ३०० कोटी, कलाडगाव ता. अर्धापूर येथे मोठ्या पुलाचे रुंदिकरण ३५ कोटी,असे १७६५ कोटी व CIRF अंतर्गत उमरी तळेगाव, उमरी वाघोळा धानोरा, करखेली रेल्वेस्टेशन,सायखेड जरीकोट दिग्रस रस्त्याची सुधारणा करणे, किनवट नागझारी नांदीगुडा ते तेलंगना राज्य सीमा, पेठवडज ते भिलूर, असे एकूण ४६ किमी च्या कामांना मंजुरी दिली.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, सा.बा. विभागाचे मुख्य अभियंता बश्वराज वाढरे, गजेन्द्र राजपूत, संपूर्ण वरिष्ठ अधिकारी भाजपा चे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. डॉ,नितीन काशिकर.सपोनी,श्रीधर जगताप, संजय पवार व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सकाळी सहा वाजता ना. गडकरी हे सहपरिवार रेणुकादेवी मंदिरात दाखल झाले व मातेची पूजा व महाआरती केली यावेळी गडावर इतर वाहनांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली होती. साडे दहा वाजता ते सभास्थळी हजर झाले.
देशभरातील चकाचक रस्ते पाहून सर्वसामान्य नागरिक. अगदी रिक्षावाले सुद्धा नितीन गडकरी यांचे नाव घेतात. त्यामुळे आगमी काळात भारत देशाला नितीन गडकरी यांच्या रूपाने मराठी पंतप्रधान लाभावा असे रेणुकामातेला साकडे घातल्याचे खा. हेमंत पाटील यांनी जाहीर भाषणात सांगितले.
५१.०३ कोटी खर्चाच्या छोट्या कामाच्या भूमीपूजनासाठी मी कधीच जात नाही परंतु माहूरची श्री रेणुकामाता ही माझं कुलदैवत आहे. आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी येथे आलो आहे. १८ महिन्याच्या कालावधीसाठी निच्छित करण्यात आलेले हे काम केवळ एक वर्षात पूर्ण करा.अशी सक्त ताकिद संबंधित कंत्राटदार व अधिकारी वर्गाला दिली आहे.