
नांदेड। २२ मे रोजी सीटूचे प्राथमिक शाळेवर माध्यानह भोजन शिजऊन विद्यार्थ्यांना जेवण देणारे कामगार विविध मागण्या घेऊन तळपत्या उन्हामध्ये भर दुपारी मोर्चा घेऊन जिल्हा परिषदेवर धडकले. या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉ.विजय गाभणे व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.


शापोआ कामगारांच्या देय इंधन,भाजीपाला व धान्यादी मलाच्या रकमेमध्ये काही मुख्याध्यापक व समितीने अनियमितता केली असून सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि संपूर्ण देय बील कामगारांच्या बँक खात्यावर टाकण्यात यावेत. शापोआ कामगारांना संडास,बाथरूम स्वच्छतेचे काम लावणाऱ्या आणि विनाकारण पाच वाजेपर्यंत शाळेत थांबवून ठेवणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी. दैनिक मुलांचे जेवणाचे ताटाचे ऑनलाईन मुख्याध्यापकाने दररोज करणे आवश्यक आहे परंतु ते केले जात नाही,जे मुख्याध्यापक करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे कामगारांना सव्वीस हजार पाचशे रुपये दरमहा देण्यात यावेत तसेच शापोआ कामगारांना सेवेत कायम करावे.


निवृत्त कामगारांना पेन्शन लागू करावे व निवृत्तीनंतर कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस कामावर घ्यावे. कामगारांना शाळा स्वच्छता करण्याचे काम लावू नये व तसे काम लावल्यास शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण समितीच्या वतीने मुख्याध्यापकांनी आपल्या पगारातून दरमहा दहा हजार रुपये कामगारास द्यावेत. देण्यात येणारे मानधन दर महा दिनांक सात ते दहा या तारखेत बँकेत वर्ग करण्यात यावे. इंधन,भाजीपाला बिल थेट शापोआ कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावे. आदी मागण्यासह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.


जोश पूर्ण घोषणाबाजी ऐकून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी स्वतः मोर्चाच्या ठिकाणी येऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. आणि तातडीने मागण्या सोडविण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.सविता बीरगे यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा करून तातडीने आदेश काढून योग्य कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिले.

सदरील आंदोलनास सीटूच्या जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार यांनी मोर्चास मार्गदर्शन करून जाहीर पाठींबा दिला. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड व तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड यांनी पाठींबा दिला.डीवायएफआय चे नांदेड तालुका निमंत्रक कॉ. जयराज गायकवाड यांनी देखीलमोर्चास पाठींबा दिला. एसएफआय च्या वतीने कॉ. मीना आरसे यांनी मनोगत व्यक्त केले व पाठींबा दिला.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य कमिटी सदस्य कॉ. अनिल कराळे,संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. दिगांबर काळे,कॉ. जनार्धन काळे, कॉ.साहेबराव दहिभाते,कॉ.मारोती तासके, कॉ.नागोराव कमलाकर, कॉ. साधनाबाई शिंदे, कॉ.शिवाजी वारले, कॉ.फारुख भाई,कांताबाई तारू, बालाजी गऊळकर, इंदुबाई डोंगरे, शिवाजी डुबुकवाड, कॉ. गंगाधर मेडकर आदींनी परिश्रम घेतले.
