
नांदेड| बौद्ध धम्मात महान त्यागाची परंपरा आहे. तसेच धम्म निष्कलंक तथा नितिमान जीवनाची शिकवण देतो. बौद्ध धम्मातच नैतिकतेला अधिक महत्त्व आहे असे प्रतिपादन मुळावा येथील ज्ञानालंकार शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महास्थवीर यांनी तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुद्धजयंती पर्वानिमित्त आयोजित पौर्णिमोत्सव कार्यक्रमात केले.


यावेळी येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू संघरत्न, भंते धम्मघोष, भिक्खूनी धम्मसेविका, प्रजापती, बुद्धकन्या यांच्यासह भिक्खू संघ, श्रामणेर संघ, इंजि. भरतकुमार कानिंदे, भगवान धबडगे, लक्ष्मीकांत शिंदे, देवराव खंदारे, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, प्रा. विलास वाठोरे, प्रज्ञाधर ढवळे, रोहिदास भगत आदींची उपस्थिती होती.


बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणच्या चाळीस बालकांना श्रामणेर दीक्षा प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे डॉ. खेमधम्मो महास्थवीर तथा मान्यवरांच्या हस्ते दीप, धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.


भिक्खू संघाच्या भोजनानंतर बोधीपूजा, त्रिरत्न वंदना संपन्न झाली. याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. सत्कार व मान्यवरांच्या मनोगतानंतर भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली. प्रफुल्लता वाठोरे, शांताबाई खंदारे, किरण चौदंते, कांताबाई पांगरेकर, पद्मीनबाई भगत, भीमराव गायकवाड, सुनंदा चांदणे, सावते आई, बगाटे आई, प्रा. मधुकर जोंधळे, नवजीवन काॅलनी, गोविंद नगर येथील उपासक उपासिका यांनी भोजनदान दिले.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात उपासक उपासिकांचे भोजनदान, दानपारमिता होऊन भिक्खू संघाच्या आशिर्वादाने धम्मदेसना कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी सायाळ येथील सुभाष लोकडे आणि वंदना खिल्लारे यांच्या संचाचा बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले तर आभार प्रदर्शन नागोराव नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा नरवाडे, सागरबाई नरवाडे, कल्याणी नरवाडे, अनिता नरवाडे, रवी नरवाडे, हट्टा येथील शेषराव खाडे, दत्तराव खाडे, दलित खाडे, उत्तम खाडे, सुरेश खाडे, संदिप खाडे, श्रावण खिल्लारे, नंदकुमार खाडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यासह बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
