
नांदेड। मासिक पाळी दरम्यान किशोरवयीन मुली व महिलांमध्ये स्वच्छता, आरोग्य व त्याचे महत्व पटवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे यावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आम्ही कटिबद्ध ही थीम घेऊन आजपासून जिल्ह्यात जनजागृती सप्ताह राबवला जात आहे. या मोहिमेचा आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी पर्यवेक्षाधिन आयएएस देवयानी यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) डॉ सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क) रेखा कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, प्रार्थमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, अशोक भोजराज, ए.आर. चितळे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच झुमव्दारे सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.


पुढे त्या म्हणाल्या, मासिक पाळी विषयावर समाजात कुठेही बोलले जात नाही. आई सुद्धा मुलीस बोलण्यास कचरते परंतु आई-वडिलांनी मासिक पाळी संदर्भात मुलीला माहिती देणे, समजून सांगणे आवश्यक आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. परंतु पारंपारिक समज, शिक्षणाचा व स्वच्छतेसाठी पुरेशा साधनसामुग्रीच्या अभावामुळे पाळीच्या दिवसात महिलांना सामना करावा लागतो.

मासिक पाळी दरम्यान महिलांची सुरक्षितता व आत्मविश्वासासह निरोगी आरोग्यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, उमेदच्या महिला बचत गट, महिला आर्थिक विकास मंडळाच्या सहयोगिनी यांच्यासह विविध घटकांनी 22 मे ते 28 मे दरम्यान मासिक पाळी जनजागृती सप्ताहात किशोरवयीन मुली व महिलांसाठी विविध उपक्रम राबवून माहिती द्यावी असे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
