
नांदेड| रोजगार हमी योजनेवरील कामगारांना वेतन अदा करावे, नियमित काम उपलब्ध करुन द्यावे यासह विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.


रोजगार हमी योजनेवरील मुखेड तालुक्यातील आखरगा व जूना नर्सरी, बामणी फाटा, बहाद्दरपूरा वनविभाग देगलूर-अजनी, बडूर, आरळी, किनवट तालुक्यातील ईस्लापूर तर सामाजिक वनीकरण मुखेड मधील सकनुर, सलगरा, बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथे नर्सरीत काम करणार्या कामगारांचे रोजगार हमी योजनेवर ऑनलाईन हजेरी पडत नाही. रोजंदारीत कपात होत आहे. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात तातडीने उपाययोजना करुन कामगारांचे आर्थिक नुकसान टाळावे, रोजगार हमी योजनेवरील मजुरांना वर्षभर नियमित काम उपलब्ध करुन द्यावे.


घरकुल योजनेत घर बांधकाम करणार्यांना मोफत रेती पुरवठा करावा, पंतप्रधान आवास योजनेत शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातही घरकुल योजनेला अडीच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, विडी कामगारांना घरकुल योजने अंतर्गत घरे बांधून द्यावीत, ग्रामीण भागात भूमीहिनांना गायरानाचे पट्टे नावावर करुन द्यावेत व गायराना संदर्भातील तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, मजूर विडी उद्योगातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात नाव व जन्म तारखेबाबत असलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात. या संदर्भात पक्षाच्यावतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालय औरंगाबाद येथे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. आपणास विनंती की या संदर्भात आपण मध्यस्थी करुन ईपीएफ, मजूर विडी व्यवस्थापन आणि कामगारांची आपल्या उपस्थितीत बैठक घेवून कामगारांचे प्रश्न सोडवावे.


आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या मोर्चात भाकपचे राज्यसचिव मंडळ सदस्य कॉ.राजन क्षीरसागर, राज्य कौन्सील सदस्य ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, जिल्हासचिव कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.देवराव नारे, कॉ.अब्दुल गफार, कॉ.प्रकाश बैलकवाड, कॉ.सय्यद मंलग, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.गोविंद गाडेकर, कॉ.दिगंबर गव्हाणे, कॉ.देविदास राठोड, कॉ.उमाजी जाधव, कॉ.रावसाहेब बेलकर, कॉ.आनंदा घोसलवाड, कॉ.संगिता भिसे, कॉ.पंचशिला कांबळे, कॉ.तुळसाबाई, कॉ.जनाबाई, कॉ.पांचाळबाई यांच्यासह विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
