नवीन नांदेड। कुठलाही गर्व, अहंकार नसलेले, लोकप्रिय ठरलेले आमदार म्हणजे मोहनराव हंबर्डे होत, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे, असे गौरवोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी काढले.
आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर माजी मंत्री डी.पी.सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खतगावकर म्हणाले, गुरुविना ईश्वर प्राप्ती आणि मौक्ष नाही, त्याचप्रमाणे माझे गुरु श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण आहेत, त्यांच्यावर माझी अफाट श्रद्धा असल्यामुळेच मी यशस्वी झालो. आ. मोहनराव हंबर्डे यांनी अशोकराव चव्हाण यांना गुरु मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मंत्रीडी.पी.सावंत यांनीही आ. हंबर्डे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे अभिष्टचिंतन केले. आगामी निवडणुकीत आ.मोहनराव हंबर्डे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान अनेक समाजोपयोगी उपक्रमांनी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे पुष्पगुच्छ देवून अभिष्टचिंतन केले.
सिडको-,हडकोसह नांदेड ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले.
सकाळी आ. हंबर्डे यांच्याहस्ते काळेश्वर देवस्थानचे दर्शन, महापुजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर गुरुद्वाराचे दर्शन घेतले. इतवारा परिसरात आयोजित महाआरोग्य शिबिराचा रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. आ. हंबर्डे यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छासह डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी लाखो रुपयांची औषधीही सुपूर्द केली. या शिबिरात दंतरोग, नेत्ररोग, हृदयविकार, मधुमेह यासह विविध आजारावर उपचार व मोफत औषधी वाटप करण्यात आले. माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, महापालिका आयुक्त व अधिकारी, कर्मचारी, नांदेड दक्षिण मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी,नगरसेवक, ग्रा.पं.सदस्य, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी आ.मोहनराव हंबर्डे यांचे अभिष्टचिंतन केले.
दुपारी कौठा येथील जनसंपर्क कार्यालयात आ. हंबर्डे यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यपद्धतीचा व विकासाचा वेध घेणारी 20 मिनिंटांची चित्रफित दाखविण्यात आली. नांदेड दक्षिण मतदारसंघात झपाट्याने झालेल्या विकासाचा संपूर्ण आढावा या चित्रफितीत दाखविण्यात आला. आपल्या लाडक्या आमदारांच्या विकासाची तळमळ चित्रफितीत ‘याचि देही याचि डोळा’ पाहून उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला.