
नांदेड। मनुष्याच्या आरोग्यासाठी शासकीय रुग्णालयासाह खाजगी रुग्णालयाची व्यवस्था असते. परंतु मुक्या जनावरांच्या उपचारासाठी मात्र पशु वैद्यकिय दवाखान्या शिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागात पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पशूंचे निदान करण्यासाठी मेटल डिटेक्टर तसेच विविध प्रकारच्या सर्जिकल साहित्याचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पर्यवेक्षाधिन आयएएस देवयानी यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, पशुधन विकास अधिकारी तांत्रिक डॉ. अरविंद गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती.


पुढे त्या म्हणाल्या, जनावरांच्या पोटात ब-याच वेळा अखाद्य वस्तू जातात. त्याचे निदान न झाल्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असेत. योग्य निदानासाठी मेटल डिटेक्टर आवश्यक असते. जिल्हा परिषद उपकर निधी मधून नांदेड, अर्धापूर, हदगाव माहूर नायगाव, मुखेड आणि कंधार या सात तालुक्यातील 62 पशुवैद्यकीय दवाखान्यांना मेटल डिटेक्टर व 101 पशुवैद्यकीय दवाखान्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अतिशय आवश्यक तसेच उपयुक्त असे सर्जिकल कीट उपलब्ध करुन दिले आहेत. या साहित्यांचा चांगाला वापर कर्मचा-यांनी करावा. त्याचे व्हिडीओ सोशल मीडीयाव्दारे प्रसिध्द करावेत जेणे करुन इतर पशुपालकांना यांची माहिती होईल, असेही त्या म्हणाल्या.


जिल्हा परिषदेच्या इतर विभागांच्या तुलनेत दुर्लक्षित असलेल्या विभागाच्या विकासासाठी विभागिय आयुक्त सुनिल केंद्रीकर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 19 नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम पूर्ण झाले. तसेच 11 दवाखान्याचे बांधकाम प्रक्रिया सूरू आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात येणाऱ्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 25 लक्ष रुपये जिल्हा परिषद उपकर निधी मंजूर करून त्याद्वारे 103 पशुवैद्यकीय दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचा हौद पुरवठा करण्यात आला आहे.

जनावरांना नियंत्रित करण्यासाठी गाव तिथे खोडा या उपक्रमात मानवविकास योजनेतून 688 गावांना खोडे पुरवठा करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात तिरुपती ट्रेडलिंक व्दारे किटचा पुरवठा करण्यात आला. त्यांनी यावेळी सर्जिकल कीटचे प्रात्यक्षकि करुन दाखवले. याप्रसंगी सर्व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
