
तालुकास्तरावर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड। राज्यातील महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तसेच स्थानिक समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आज गुरुवार दिनांक 25 मे रोजी प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिबिरात महिला व बाल कल्याण विभाग, कृषी, महसूल, नगरपालिका, आदिवासी, महिला आर्थिक विकास महामंडळ, अन्न व नागरी पुरवठा, आरोग्य, विधीलेखा प्राधिकरण आदी विभागाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त सुरू असलेल्या आम्ही कटिबद्ध जनजागृती सप्ताह निमित्त मासिक पाळी व्यवस्थापना विषयी या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात यापूर्वीच गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिबिरांचे आयोजन करून, झालेल्या कार्यक्रमांचा अहवाल जिल्हा परिषदेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. आज होणाऱ्या या शिबिरात जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख हे शिबिरांना भेटी देणार आहेत.