नांदेड| महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन महिलांना महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील 2 हजार 620 महिलांची निवड करण्यात आली आहे. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. 31 मे रोजी पुण्य अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे गाव पातळीवर आज वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरित करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पाचशे रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कारसाठी महिलांची निवड ग्रामपंचायत स्तरावरील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या समितीमार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 310 ग्राम पंचायत अंतर्गत 5 हजार 772 महिलांनी या पुरस्कारासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 2 हजार 620 महिलांना या पुरस्काराने आज गावस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात सदरचा उपक्रम सर्व ग्रामपंचायत मधून यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच तालुकास्तरावर गट विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी तर ग्रामपंचायतीवर पातळीवर सरपंच व ग्रामसेवक ही यंत्रणा परिश्रम घेत आहे.
मंगल सांगवी येथे सीईओ यांची राहणार उपस्थीती
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी कंधार तालुक्यातील मंगल सांगवी येथे होणाऱ्या कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गावस्तरावर होणा-या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत राहणार आहेत.