नायगांव बा.। येथिल जिल्हा खरेदी विक्री संघाच्या जागेचा प्रश्न सहकार मंत्र्यांकडे नेऊन फार मोठा तीर मारल्याचा आव रिपाईचे आ.राजेश पवारांकडून आणला जात असून या प्रकरणात लोकशाहीमार्गाने आमचा लढा सुरुच असल्याने निश्चितच न्याय मिळेल परंतू,स्वतःच्या…खरकटे असणाऱ्यांनी याबाबत आम्हाला शिकवू नये त्याउलट त्यांच्याकडील नांदेडची कामधेनू असलेली टेक्स्काॅम चालू करण्याबाबत प्रयत्न करावेत असा सल्ला भाजपा नेते गजानन चव्हाण यांनी एका पत्रकातून दिला आहे.
नायगांव बाजार येथिल जिल्हा खरेदी विक्री संघाच्या जागेबाबत येथिल आ.राजेश पवारांनी राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार करुन याबाबतची प्रसिद्धी दिलेली असून त्यांना या प्रकरणात कुठलेच ज्ञान नसल्याचा आरोप भाजपाचे माजी शहराध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांनी केला आहे.त्यांच्या मते गेल्या वीस वर्षापासून सदरील जमिन संबंधित शेतकऱ्यांना मिळावी म्हणून सामाजिक भूमिका जोपासत त्यांचे जेष्ठ बंधू चंद्रकांत पाटील चव्हाण तसेच, या जागेचे मूळ मालक गोविंद मानिका शिंदे, बालाजी गोविंद शिंदे हे तालुका न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढा देत असून ही जमीन जागा माझी असतांना चुकीच्या पद्धतीने तत्कालीन सत्ताधारी लोकांनी सत्तेच्या बळावर नावावर लावून घेतली.
म्हणून ही जागा परत मूळ मालकाला व्हावी / द्यावी अशा पद्धतीची याचिका छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात दाखल केली आहे.जिल्हा खरेदी विक्री संघावर आवसायिक नेमल्यानंतरही ही जागा २००२ मध्ये बेकायदेशीरपणे विक्रीस निघाली होती त्या विरोधामध्ये माझे बंधू व मूळ मालक यांनी पुढाकार घेऊन न्यायासाठी महसूल सह दिवानी न्यायालय मध्ये अनेक न्यायालयीन आदेश घेत लढा चालू ठेवला आहे.
असे असताना ह्या जमिनीच्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा बिनबुडाचा आरोप रिपाई (आठवले गट) या मित्रपक्षाच्या कोट्यातून उमेदवारी घेऊन भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून नायगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार राजेश पवार यांनी या प्रकरणात राज्याच्या सहकार मंत्री यांना तक्रार दिली असून श्रेयवादासह यापूर्वि त्यांनी केलेल्या अनेक तक्रारीतून साध्य केल्यानुसार याठिकाणचीही काही जमीन स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
महत्वाचे म्हणजे नांदेडचे वैभव व कामगारांची कामधेनु म्हणून सुपरिचित असलेली नांदेडची टेक्सकाॅम आ.पवार यांच्या मालकीची आहे शासनाकडून खरेदी करतांना ती पूर्ववत चालू करण्याचे करारनामा केला होता परंतू,ती चालू करणे दूरच त्याउलट प्रशासनाची व नांदेडसह मराठवाडा व लगतच्या विदर्भ,आंध्रप्रदेश,तेलंगणा, कर्नाटक आदी ठिकाणच्या नवतरुण युवक मजदूर,कामगार बांधवांची दिशाभूल करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलेले आहेत एवढेच नव्हे तर,या मतदारसंघात कृष्णूरची पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अद्याप एकही उद्योग आणण्याचे प्रयत्न केले नाहीत त्यांनी येथिल बेरोजगारीला वाढवून दूसरीकडे स्वतःची आर्थिक संपत्ती वाढवली असून टेक्सकाॅम प्रकरणात नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी व संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याने लवकरच याप्रकरणात आमरण उपोषणास बसणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.
त्याचबरोबर,या प्रकरणात व टेक्सटाइल, टेस्टकॉमच्या सदरील जागेत अवैध पद्धतीने व्यवसाय चालू असल्याच्या प्रकरणात तसेच, विविध बाबीचे पुराव्यासह आमच्याकडे माहिती उपलब्ध असून त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी ही शेतीच्या कमाईतून आलेली आहे की त्यांचा असा कोणता उद्योग किंवा फॅक्टरी सुरू आहे ज्याच्यातून सदरची कमाई झालेली आहे ती त्यांनी दाखवावे आ.राजेश पवारांनी अशोक हॉटेल,छत्रपती संभाजी नगर व राजस्थान येथील प्रॉपर्टीतून त्यांचे वडील व त्यांनी मोठ्या प्रमाणात कमाई केलेली आहे याचीही लवकरच आम्ही रीतसर तक्रार करणार आहोत त्यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवून मी फार स्वच्छ धुतल्या तांदळासारखा आहे आणि इतर मात्र फार भ्रष्ट्राचारी आहेत अशा पद्धतीचा आव आणून दिशाभूल करीत असल्याचेही गजानन पाटील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.