नांदेड। वसुधैव कुटुम्बकम या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जी- 20 समीट येत्या 19 ते 22 जून दरम्यान पुण्यात होणार असून यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी असणार आहे. यावर लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक चळवळ उभी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात अनेकविध उपक्रम घेण्यात येत आहेत. अध्ययन समृद्धी कार्यक्रम, माझी शाळा सुंदर शाळा, आई-बाबांची शाळा, अध्ययना अनुकूल रंगरंगोटी, लोकसहभागातून शाळा समृद्धी, शाळांचे संगणकीकरण, शिक्षक समृद्धी प्रकल्प, ऑक्सीजन पार्क, सीडबॉल, शाळेतील पहिले पाऊल, शाळा तिथे ग्रंथालय, एक तास वाचनासाठी असे अनेक कार्यक्रम शिक्षण गतिमान करण्यासाठी राबविण्यात येत आहेत.
2023-24 या शैक्षणिक वर्षातही अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाषा, गणित समृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, डायटचे अधिव्याख्याते यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबविली जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान मिशन मोड मध्ये 2026-27 पर्यंत प्रत्येक बालकाला साध्य करून सुनिश्चिती करायची असल्याने गुणवत्ता पूर्ण पायाभूत शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण विहित मुदतीत व्हावे अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.
येत्या 15 जून रोजी जिल्ह्यात शाळा सुरू होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, दिनांक 14 व 15 जून रोजी शाळा पूर्वतयारीसाठी शाळा पातळीवर कार्यक्रम, प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, लोकप्रतिनिधींना निमंत्रण असे नानाविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यात लोकसहभागही मोठ्या प्रमाणावर मिळविण्यात येणार आहे.