राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी येणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती खाली घसरली याचे द्योतक आहे. राजकारणात मतभेद असतात. जयपराजयाची लढाईही असते. परंतु राजकारणात कोणाच्या जीवावर उठायचे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. परंतु महाराष्ट्रात सध्या जे तमाशे सुरु आहेत ते पाहता आता खरंच विचारावे वाटते की कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या राजकीय विचारसरणीबाबत, ध्येयधोरणाबाबत मतभेद असू शकतात. ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत म्हणून कोणी त्यांच्याविरोधात बोलायचे नाही, त्यांच्यावर टीका करायची नाही असाही नियम नाही. ते जेथे चुकतील तेथे विधायक टीका केली पाहिजेत. तो अधिकार सर्वाना आहे. परंतु ती टीका करताना कोणीही पातळी सोडता कामा नये. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रात त्यांनी मंत्रिपदे भूषविली. एका पक्षाचे ते अध्यक्षही आहे. त्यांच्या भूमिकाबाबत अनेकवेळा वाद झाले. अगदी वसंतदादाचे सरकार पाडण्यापासून त्यांच्यावर टीका होते. परंतु ती करताना त्यांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली पाहिजेत. त्यांच्यावर व्यक्तिगत द्वेष आहे, राग आहे म्हणून टीका होता कामा नये.
परंतु आता गोष्ट टीकेच्या पलिकडे गेली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी आली. तुमचा दाभोळकर करु असे धमकी देणाऱ्याने म्हटले. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी कितीही राग असला तरी त्यांना जीवे मारण्याचा कोणालाही अधिकार नाही. शरद पवारच नाही तर समाजातील कोणालाही कोणीही जीवे मारण्याची कृती ही कधीच समर्थनीय नाही. त्यामुळे ही धमकी निषेधार्ह आहे. दुर्देवाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आज इतका खाली घसरलाय की कोणालाच बोलायची सोय राहिली नाही. असे म्हणतात की, शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गावा. याचा अर्थ असा की, पोवाडा गाणाराही त्याच तोलामोलाचा असला पाहिजेत. टीकेचेही तसेच आहे. तोलामोलाच्या माणसानेच टीका केली पाहिजेत. शरद पवारावर टीका करायची झाल्यास ती त्याच तोलामोलाच्या माणसाने केली पाहिजेत. राजकारणी माणसं याचे सुद्धा भान ठेवत नाहीत. कोणीही उठतात कोणावरही टीका करतात. निलेश राणे शरद पवारांवर टीका करताना त्यांना औरंगजेबाची उपमा देतात. हे कितपत योग्य आहे? शरद पवार कोठे निलेश राणे कोठे? याचा काही ताळमेळ आहे का?
खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. तेही निषेधार्ह आहे. संजय राऊत रोज सकाळी उठून टीव्ही कँमेऱ्यासमोर जी वक्तव्ये करतात त्याने महाराष्ट्र वैतागलाय. हे खरे असले तरी त्यांच्या जीवावर उठावे हे योग्य नाही. त्यांच्या भूमिका चुकीच्या असतील, त्यांची वक्तव्ये बेलगाम असतील. याचा अर्थ त्यांना आयुष्यातून उठवायचे असे नाही. विचाराचा सामना विचाराने केला पाहिजेत. विरोधी विचाराच्या माणसांना यमसदनी पाठवायचे ही लोकशाही नाही, त्याला मोगलाई म्हणतात.
लोकशाहीत राज्य कायद्याने चालले पाहिजेत. गुंडगिरीने नाही. सर्वात महत्वाचे कोणाचा खून केला म्हणजे त्याचे विचार मरत नसतात. गांधीचा खून झाला म्हणून गांधी विचार संपला नाही. दाभोळकरांचा, पानसरेंचा खून झाला म्हणून त्यांचे विचार संपले नाहीत. ते अजरामर झाले. आमच्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदते असे डंका पिटत आपण जगभर हिंडत असतो. महाराष्ट्र देशाला विचार देतो, दिशा देतो असेही अभिमानाने सांगतो. स्वातंत्र प्राप्तीचे उगमस्थान महाराष्ट्र आहे असेही आपण अभिमानाने सांगतो. त्याच महाराष्ट्रात एखाद्याला संपविण्याची भाषा करणे हे महाराष्ट्राची मान खाली घालण्याचे कृत्य आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार पूर्वी अशा गोष्टीसाठी टीकेचे विषय होते. आपले त्याही खालच्या पातळीवर राजकारण चालले आहे. ते सुधारले आपण बिघडत चाललो. त्याचे भान सर्वानीच ठेवले पाहिजेत. दुर्देवाने महाराष्ट्रातील राजकारणाची साधन सुचिता आता शिल्लक राहिलेली नाही. सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच सर्व राजकारण्यांचे एकमात्र साध्य बनले आहे. सत्तातुराणां न भयं न लज्जा अशी परिस्थिती झाली. त्यातून हे सर्व तमाशे होत आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी यातले काहीही नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातले हे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. ९.६.२३, मो.नं. ७०२०३८५८११