नांदेड| तालुक्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध समाजातील अक्षय भालेराव याची हत्या झाली होती. त्यानंतर भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बोंढार हवेली येथे जाऊन अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
नांदेड शहरा लागत असलेल्या बोंढार हवेली येथे बौद्ध समाजातील तरुण अक्षय भालेराव याचा खून करण्यात आला होता . अक्षय भालेराव यांच्या खुनानंतर गावात सामाजिक ताण तणाव निर्माण झाला होता. हा ताण तणाव कमी करून गावात पुन्हा एकदा सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाला सुचित केले होते. शिवाय आज दिनांक 8 जून रोजी खा. चिखलीकर हे स्वतः बोंढार हवेली येथे जाऊन मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले.
शासनाकडून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास दिला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू खोमणे, धम्मपाल धुताडे, लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, साहेबराव गायकवाड, रोहित पाटील, साहेबराव काळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
दरम्यान गावातील मराठा समाजातील काही सामान्य नागरिकांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी भेट घेतली. सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण करणारे अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. अशा सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवरही कारवाई करावी यासाठी आपण लक्ष घालावे अशी विनंती केली. गावात कोणीही कायदा हातात घेऊ नये.
गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे कोणतेही कृती करू नये, सोशल मीडियावरती जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करू नयेत असे करणाऱ्यावर कायद्याने कारवाई होईल असे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिला.