नांदेड। आरोग्य अभियानामध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनावर कार्य करणाऱ्या किनवट तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक अलीकडे खुपच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.आरोग्य अभियानातील तालुका गट समूहक काकडे हे अत्यंत खालच्या भाषेत या महिलांना बोलतात जेणेकरून त्यांच्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल.वावचर मध्ये त्रुटी असल्याचे कारण सांगून जनार्धन काकडे हे आशा व गटप्रवर्तक ताईंना सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी जाणीवपूर्वक घरी बोलावून घेतात आणि मानधन व वेतनातील फरक निकाली काढण्यासाठी खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करतात तसेच पैसे देण्यास नकार दिल्यास अश्लील भाषेचा वापर करून अपमानित करतात असा गंभीर आरोप सीटूच्या लेटरपॅड वर देण्यात आलेल्या निवेदनामध्ये आशांनी केला आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुका समूहक आणि आरोग्य अधिकारी हे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत परंतु त्यांचा शान शोक व राहणीमान यखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांना लाजवेल असे पहावयास मिळते.
आशांच्या आज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीचे पैसे उचलून अफरातफर आणि अनियमितता करण्यामध्ये चतुर असलेल्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सीटू ने यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. आरोग्य अभियानातील घोटाळा मोठा असून सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दि.९ जून रोजी सिईओ वर्षा ठाकूर – घुगे यांची सीटूच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन तातडीने दोषींना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तेव्हा वर्षा ठाकूर यांनी आरोग्य विभागाचे डॉ.रुईकर यांना या प्रकरणात काकडे वर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.सिईओ ठाकूर यांनी आपल्या कक्षाच्या बाहेर येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले आहे.
आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये अनियमितता करणाऱ्या आणि कार्यकाळ संपूनही तळ ठोकून एकाच ठिकाणी असलेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना सीटू दणका दाखविणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखविले आहे.
शिष्ठमंडळामध्ये फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, अनुराधा मरसकोल्हे, ज्योती कपाटे,निर्मला शिनगारे, इंदुताई चव्हाण,ललिता जाधव, ललिता फोले,अर्चना भालेराव,ज्योती पंधरे,अनिता जाधव, गोदावरी राठोड, लता पवार,मनीषा करपते, प्रेमीला कुंभेकर, वैशाली वाघमारे यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.