कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड, मोबाईल – ७७०९२१७१८८
e-mail – gangadhargaikwad55@gmail.com
(लेखक हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड कमिटीचे सचिव आणि राष्ट्रीय इंग्रजी वृत्त पत्र द हिंदू चे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते आहेत.)
पुरोगामीत्व संपुष्टात येत असलेल्या जातीयवादी महाराष्ट्रात दररोज मन सुन्न करणाऱ्या घटना जलद गतीने घडताना दिसत आहेत.नांदेड जवळील बोंढार – हवेली येथील दलित युवक अक्षय भालेराव च्या निर्घृण हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरला असून समग्र भारत देशात संतापची लाट पसरली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या रागातून व जात श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून दि.१ जून २०२३ रोजी अक्षय भालेराव हत्याकांड घडले असून येथे शासन व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरली आहे.
काही मतलबी पत्रकारितेमुळे व बड्या धेंडाच्या गुलामीत दंग झाल्यामुळे दोन दिवस प्रकरण दाबून सर्व काही अलबेल आहे अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणास समाज माध्यमातून वाचा फुटल्यामुळे नांदेडच्या दलित हत्याकांडाची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर आणि देशभर पोहचली. राज्याच्या राजधानीतून आणि देशाच्या कानकोपऱ्यातून नांदेड येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना चॊकशीसाठी फोन येऊ लागले. मग वस्तुस्थिती आणि सत्यता पडताळणीसाठी बोंढार – हवेली येथे कार्यकर्त्यांची रिघ लागली.
घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे व उदासीन शासन व्यवस्थेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरत होती.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा दि.२९ एप्रिल २००३ रोजीमौजे बोंढार येथे काढण्यात आली हाच भक्कम पुरावा तेथील गावगुंड – सवर्ण आणि अक्षयचे मारेकरी हे जातीयवादी आहेत यासाठी भक्कम व पूरक आहे. ज्या सवर्णाच्या लग्न वरातीमध्ये दि.१ जून २०२३ रोजी नंग्या तलवारी घेऊन मुक्त नृत्य करणे, डीजे वाजवीण्यास प्रतिबंध असतानाही प्रमापेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवीने बेकायदेशीर आहे ; हा तपासाचा भाग असल्यामुळे जे सत्य आहे ते बाहेर येईलच.
जातीय द्वेष्यातून झालेली अक्षयची हत्या ही वेगळ्याच कारणाने झाली असा केविलवाणा प्रयत्न करणारेही काही महाभाग पुढे येत आहेत.परंतु
क्रांतीचे प्रतिक व ऐतिहासिक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोकांना आक्रमकपणे रस्त्यावर येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. प्रसार माध्यमा मधून देखील नंतर खऱ्या बातम्या समोर आल्या. त्यामध्ये देखील काहींनी सोईस्करपणे लिहण्याचे टाळले नाही. हे देखील तेवढेच खरे.
आंबेडकरवादी आणि डाव्या लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष – संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अनेक तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलने करून विविध मागण्या राज्यपाल, मुख्यमंत्री,गृहमंत्री, जिल्हाधिकारी आदींकडे करण्यात आल्या. अनेकांनी निवेदने दिलीत.
घटनेस आठवडा उलटूनही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अद्याप पीडितांची भेट घेतली नाही.हे निषेधार्हच म्हणावे लागेल. आणि पहाता पहाता बोंढार हे गावं दलित हत्याकांडामुळे देशभर चर्चेत आले. अक्षयची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे म्हणून राज्यभर आंदोलने होत आहेत. तसेच कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना निर्माण झाली आहे.
अक्षयच्या सरणाचा विस्तव विझलाही नव्हता*… तर बाजूला असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर मध्ये राहणाऱ्या दलित प्रवर्गातील गिरीधारी तपघाले या मातंग समाजाच्या कर्जबाजारी मजुराचा सवर्ण असलेल्या आरोपी लक्ष्मण मार्कण्ड व प्रशांत वाघमोडे यांनी निर्घृण खून केला. हत्या,अत्याचार ह्या घटना नित्याच्याच झाल्या सारख्या वाटत आहेत. शहराच्या आजू बाजूला असलेल्या गावं खेड्यामध्ये आजही दलितांना मंदिर प्रवेश नाही ही वास्तविकता असून नाईलाजाने येथील दलित आम्ही स्वतः मंदिरात जात नाही असा आव आणतात.
लागोपाठ घडणाऱ्या वेदनादाई घटना पिच्छा सोडण्यास तयार नाहीत
चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृहात एका १९ वर्षीय दलित विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तेथील सुरक्षा रक्षकाचा संशयितरित्या मृतदेह आढळला. वस्तीगृहाच्या गृहपाल आणि मदतनीस उपस्थित नव्हत्या. धक्कादायक म्हणजे मागील सतरा वर्षांपासून एका प्राध्यापिकेकडे गृहपाल पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे.वरील सर्व बाबी ह्या संशयाचे घर करून जातात. दुसऱ्या निषेधार्ह घटनेत मनोज साने नावाच्या नराधमाने लिव्ह इन राहणाऱ्या महिलेची क्रूरपने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंगावर शहारे आणणारे दलित हत्याकांड आणि अत्याचार प्रकरण..
दिनांक २९ सप्टेंबर २००६ हा दिवस दलितांसाठी काळा दिवस आहे.आजही दलित प्रवर्गातील लोक काळा दिवस म्हणूनच मानतात… दि.२९ सप्टेंबर रोजी खैरलांजी येथील भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबातील सुरेखा,प्रियंका,सुधीर आणि रोशन या चार जणांनाची जातीयवाद्यांनी अत्यंत अमानुषपणे निर्घृण हत्या केली होती.परंतु त्यांना येथोचित न्याय मिळाला नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथील मातंग समाजाच्या १७ वर्षीय इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या नितीन आगेची २८ एप्रिल २०१४ मध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.सवर्ण मराठा मुली सोबत त्याचे प्रेम होते म्हणून त्याची हत्या करण्यात आली.साक्षीदार फितूर झाल्यामुळे सर्व आरोपी नर्दोष सुटले आहेत.
कंधार जिल्हा नांदेड येथील इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनिता बसवंतेची आत्याचार करून हत्या करण्यात आली. सातेगांव ता.नायगाव जि. नांदेड येथील चंद्रकांत गायकवाड या दलित मुलाने सवर्ण मुली सोबत प्रेम केले म्हणून त्याचे डोळे काढण्यात आले होते. या मध्ये देखील साक्षीदार फितूर,आरोपी निर्दोष अशी सत्यता आहे.
देशात गाजलेले दलित हत्याकांड; १० दलितांची हत्या ४२ वर्षानंतर निकाल…
पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री व्ही.पी.सिंग यांना जावे लागले होते घटनास्थळी
उत्तर प्रदेश मधील शिकोहाबाद विभागातील फिरोजाबाद जिल्ह्यातील साडूपूर गावामध्ये सवर्णानी दलित प्रवर्गात असणाऱ्या जाटव समुदायातील १० जणांना बंदूकीच्या गोळ्या घालून ठार केले होते. ही घटना सन १९८१ मध्ये घडली असून तेव्हा संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती.तेव्हा मुख्यमंत्री व्ही.पी. सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. पी.सिंग आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हत्याकांड घडलेल्या गावामध्ये भेट द्यावी लागली होती.या हत्याकांडाच्या अनुषंगाने तेव्हाचे विरोधी पक्ष नेता माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांनी देशभर रान पेटविले होते. या गुन्ह्यात एकूण १० आरोपी होते.
या खटल्याचा निकाल ४२ वर्षांनी लागला व निकाल लागेपर्यंत या खटल्यातील ९ आरोपिंचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक आरोपी जिवंत असून त्याचे वय ९० वर्षे आहे आणि त्यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
म्हणून दलित – आदिवासी प्रति उदासीन असलेल्या शासन व्यवस्थेचा आजही जाहीर निषेधच होत आहे.
…कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड, मोबाईल – ७७०९२१७१८८
e-mail – gangadhargaikwad55@gmail.com