नांदेड,अनिल मादसवार| वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, वनक्षेत्र वाढावे यासाठी सामाजिक वनीकरण विभागांतर्गत ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा मंत्र दिला जात असला, तरी या विभागाच्या रोपवाटिकेत आजमितीस मोठ्या प्रमाणात रोपे पडून आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी ती वाळून गेल्याने पुन्हा ऐन कडाक्याच्या उन्हात वृक्ष लागवड करून लाखोंची बिले उचलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा फार्स गेल्या २ महिन्यापासून सुरु असून, याबाबत काय..? कार्यवाही झाली हे मात्र सध्यातरी लाल फितीत ठेवण्यात आल्याने चौकशी समिती देखील हे प्रकरण रफादफा करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय निर्माण होण्यास वाव मिळत आहे. सामाजिक वनीकरणतर्फे पर्यावरण दिनाचे फोटोसेशन करून गाजावाजा करण्यात आला, परंत्तू मागील चौकशी व लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपानाच काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे.
चार दिवसांपूर्वी सर्वत्र जागतिक वनदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण विभागाने पर्यावरण क्षेत्रात काम करणार्याच्या सहकार्याने वृक्ष लागवडी विषयक जनजागृती करण्याचा गाजावाजा झाला. त्यानंतर प्रत्यक्षात या विभागाने नेमक्या कोणत्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली याची माहिती मिळू शकली नाही. सार्वजनिक आणि खासगी पडीक जमिनीवर, ग्रामीण भागात, शहरी भागात, औद्योगिक क्षेत्रात हरित पट्टे निर्माण करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला असून, राष्ट्रीय कृषी आयोगाने सखोल अभ्यास करून 33 टक्के भौगोलिक क्षेत्र हे वृक्ष आच्छादनाखाली असावे असे निर्देश दिलेले आहेत.
वनखात्याबरोबरच वनेत्तर क्षेत्रावर देखील मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण संचालनालयाची निर्मिती केली. या विभागामार्फत खासगी क्षेत्रावर, रस्त्याच्या दुतर्फा, वृक्ष लागवडीचे बंधन घालण्यात आले आहे. त्याव्दारे 33 टक्के भूभागावर उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे रोपे लावल्याची दाखवून लाखोंच्या प्रमाणावर देयके उचलण्यात आली आहेत. परंतु आजघडीला जिथे रोपे लावली ती रोपे वाळून गेली आहेत. तर रोपवाटिका आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात रोपे पडून आहेत..? अशी विश्वसनीय माहिती आहे. ते पहाता राष्ट्रीय कृषी आयोगाच्या आदेशांना हदगाव सामाजिक वनीकरण विभागाकडून हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे तथाकथित भ्रष्टाचाराची चौकशीच्या फेऱ्यात हदगावचे सामाजिक वनीकरण विभाग चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळेच सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे झाडे लावल्याची दाखवून झाडे लावलीच नसलेल्या ठिकाणी चौकशीच्या तोंडावर झाडे लावून सावरासावर केली जात असल्याचे चित्र उघड झाले आहे.
पावसाळ्यात अनेक गावाच्या मुख्य लोकांकडून सामाजिक वनीकरणच्या अधिकार्यांकडे वृक्षरोपणा विषयीची मागणी केली होती. मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दुर्लक्ष करून आपल्या मर्जीने बिले काढण्याच्या वेळी अचानकपणे उन्हाळ्यात वृक्ष लागवड करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. हाच धागा धरून मागील काळात हदगाव हिमायतनगर तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामाच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित झाला. तेंव्हापासून हदगाव हिमायतनगर तालुक्यात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी सुरु झाली. यास दोन महिने लोटले मात्र ती चौकशी अजूनही लालफितीत असल्यामुळे सामाजिक वनीकरणाच्या अंतर्गत येणार्या अनेक योजनांचा योग्य तो फायदा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने पुढे येत आहे. हि बाब लक्षात घेता याची गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.