नांदेड। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणाच्यावेळी पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचा नांदेड जिल्हा प्रागतिक पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हा प्रागतिक पक्षाच्यावतीने आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शनिवारी सायंकाळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील आमरण उपोषणास बसले असतांना पोलीस यंत्रणेने वरिष्ठांच्या आदेशानुसार अचानक लाठीमार व गोळीबार केला. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. एकीकडे वाटाघाटीचे नाटक करायचे आणि दुसरीकडे अचानक लाठीमार, गोळीबार करायचा ही शासनाची कार्यपध्दती लोकशाहीसाठी घातक आहे.
राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अमानुषपणे लाठीहल्ला करणार्यांवर कठोर कार्यवाही करावी. आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. केंद्र व राज्य सरकारकडून सुरु असलेले कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे धोरण रद्द करुन सर्वांना समान संधी, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाचे धोरण प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाकपचे ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, माकपचे कॉ.विजय गाभणे, ज.द.से.चे सूर्यकांत वाणी, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ.दिगांबर घायाळे, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.पल्लवी रावते, कॉ.मारोती घोरपडे, प्रफुल्ल कउडकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.