नांदेड। बिहार राज्यातील वीस वर्षीय कामगार नामे सकिंदर रॉय पिता सुरेश रॉय हा कामगार नांदेड जिल्ह्यातील बिलोली जवळील येजगी पुलाचे काम चालू असलेल्या राज राजेश्वरी कंस्ट्रक्शन प्रा.लिमिटेड कंपनी हैद्राबाद या साईटवर मजूर म्हणून कामाला होता.
तो मूळचा रा.भूतरी पोस्ट समसिपूरमीठ ता.बछवारा जि. बेगुसराय (बिहार) येथील एका शेत मजूर असलेल्या आई वडिलांचा मुलगा.
कामगार पुरवठा करणाऱ्या एका ठेकेदारा सोबत तो बिलोली येथे कामगार म्हणून कामाला आला होता. दुर्दैवाने दि.१८ मे २०२३ रोजी तो येजगी येथील पुलावरून काम करीत असतांना तोल जाऊन साधारणतः ७० ते ८० फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडला.त्याला निझामबाद येथील श्रीकृष्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कंपनीच्या लोकांमर्फत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर जखमी झालेल्या सिकंदर रॉयचा उपचारादरम्यान दि.१९ मे रोजी मृत्यू झाला.
अंत्यविधी गावी बेगुसराय जिल्ह्यात करण्यात आला. पार्थिव पाठविण्याची व्यवस्था कंपनीनेच केली होती. दोन ते तीन महिने उलटून गेले होते. हाताश मयताचे आई- वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना मदत आणि पूनर्वसन ह्या बद्दल काहीही माहिती नव्हते. परंतु ते बिहार येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हितचिंतक आणि अखिल भारतीय शेत मजूर युनियनचे सभासद असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या स्थानिक कमिटीचे सभासद आणि अखिल भारतीय शेत मजूर युनियन चे नेते असलेले कॉ.उमेश कुंवर जे बिहारचे नामवंत कवी आहेत त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तातडीने बिहार राज्याचे माकप राज्य सचिव कॉ.ललन चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला.
कॉ.ललन चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे माकप राज्य सचिव कॉ. प्रा.डॉ.उदय नारकर यांना फोन वरून सर्व माहिती सांगितली आणि सहकार्य करावे असे कळविण्यात आले.कॉ.डॉ.नारकर यांनी दि.२१ ऑगस्ट रोजी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा मराठवाडा निमंत्रक कॉ.विजय गाभणे(नांदेड) यांना पीडित कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सूचित केले.
कॉ.विजय गाभणे आणि माकप नांदेड तालुका सचिव तथा पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड तसेच पक्षाचे हितचिंतक ऍड.दिलीप आडे हे दि.२२ ऑगस्ट रोजी बिलोली येथे सकाळी गेले.मयताचे वडील आणि कॉ.उमेश कुंवर हे बिलोली येथे अगोदरच पोहचले होते.माकप च्या शिष्ठमंडळाने सर्वप्रथम बिलोलीचे पोलीस उप विभागीय अधिकारी श्री पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या निदर्शनास प्रकरण आणून दिले आणि पोलिसांनी राज राजेश्वरी कन्स्ट्रकशनच्या जबाबदार लोकांना बिलोली पोलीस स्थानकात बोलावून घेतले आणि मयताचे वडील कॉ.सुरेश राय आणि कॉ.उमेश कुंवर यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली.
बिलोली पोलीस स्थानकात घडलेल्या घटनेची नोंद आणि प्रथम खबर घटना घडली तेव्हाच घेण्यात आली होती. चर्चे मधून तडजोड होण्याची शक्यता पुढे आली. आणि कंपनीच्या वतीने नुकसान भरपाई पोटी रुपये चार लाख पीडित कुटूंबियांना देण्याची तयारी कंपनीच्या वतीने दर्शविण्यात आली. परंतु मृत्यू झालेला कामगार हा तरुण असल्याने आणि घरचा तोच आधार असल्यामुळे दहा लाख रुपये मदत करावी असा प्रस्ताव माकपणे कंपनीपुढे ठेवला आणि दोन ते दिवस चाललेल्या चर्चेअंती नऊ लाख रुपये डिमांड ड्राफ द्वारे मयताच्या आई वडिलांना देण्याचे कंपनीने मान्य केले.
दि.५ सप्टेंबर रोजी मयत सकिंदर रॉय ची आई श्रीमती संतोषी देवी यांच्या नावाने चार लाख पन्नास हजार आणि वडील सुरेश रॉय यांच्या नावाने चार लाख पन्नास हजार रुपयांचा डिमांड ड्राफ कंपनीच्या वतीने बिलोली येथे रॉय कुटुंबियांना सुपूर्द केला असून कंपनीच्या वतीने साईट मॅनेजर श्री बालकृष्ण रेड्डी, व्यवस्थापक वेंगल राव आणि साईट इंजिनिअर श्री रुपेश सुराणा आदिजन यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय किसान सभेचे बिलोली विभागाचे नेते कॉ. गंगाधर आरसे यांनी या मदत व पुनर्वसन कार्यात पूर्ण वेळ दिला असून बिहार वरून आलेल्या कॉम्रेड्सची बिलोली येथे राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.
कॉ.विजय गाभणे यांनी पूर्ण वेळ देऊन योग्य पाठपुरावा केल्यामुळे बिहारच्या मयत कामगाराच्या कुटूंबियांना तातडीने नऊ लाख रुपये मिळवून देण्यात आले आहेत आणि ही गोष्ट छोटी जरी असली तरी ती डोंगरा येवढी आहे कारण शेत मजूर असलेल्या आई वडिलांना तातडीने मदत मिळवून देण्यात आली असून आलेले दुःख न पचविण्यासारखे आहेच परंतु हे मदत करण्यात आलेले यश खुपच समाधानकारक बाब आहे असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.