नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील सांगवी येथील कै. नारायणराव पाटील कदम माध्यमिक विद्यालयातील ८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिल्या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापिका ताराबाई बापूराव जाधव यांच्यासह तिघांच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात दि.5 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीच शिक्षण उपसंचालकांनी त्या आठही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द केल्या आहेत.
आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा संचलित कै. नारायणराव पाटील माध्यमिक विद्यालय नायगाव तालुक्यातील सांगवी येथे असून. या संस्थेत मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यात ८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी वरुन वाद असून. संस्थेचे अध्यक्ष भगवान पवार यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचांऱ्यांच्या बोगस वैयक्तिक मान्यता पुर्वप्रभावाने रद्द कराव्यात अशी मागणी केली होती.
सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूची मते ऐकूण घेतल्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांनी दि.27 एप्रिल रोजी शाळेतील ८ कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची शिफारस केली होती. शिक्षण उपसंचालक लातूर डॉ. गणपत मोरे यांनी अभिलेख पाहून माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड यांचा निर्णय कायम ठेवत ८ कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता रद करण्यात येत आहेत असा निर्णय दि.12 – जुलै 2023 रोजी दिला.
त्यामुळे संस्थेचे मुळ अध्यक्ष भगवान पवार होटाळकर यांनी सदर प्रकरणी संस्थेचे बनावट अध्यक्ष दिगांबर नारायण कदम, मुख्याध्यापिका ताराबाई बापूराव जाधव व ज्यांच्या नावे बनावट शालार्थ आय डी काढण्यात आली त्या मैनाबाई नारायण हिवराळे यांच्या विरोधात शासनाची व शाळेतील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावे अशी मागणी केली होती.
त्यामुळे दि.5 रोजी शिक्षक दिनाच्या संध्याकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिक्षक बळीराम यरपलवाड यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत वरील तिन्ही पदाधिकाऱ्यांनी संस्थेतील ८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती देवून शिक्षणाधिकारी नांदेड यांचेकडे बोगस ठराव पाठवला. त्याचबरोबर शालार्थ आय डी मंजूर करुन घेवून शासनाची व शाळेतील कर्मचाऱ्याची दिशाभूल करुन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.