नांदेड। नांदेड येथील (औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर महसूल विभागाचे विभाजन करून मराठवाड्यातील दुसरे महसूल आयुक्तालय कार्यालय आगामी तीन महिन्यात सुरू करावे असे आदेश लोकायुक्त यांनी राज्य सरकारला दिले आहेत.त्यामुळे नांदेडकरांच्या व सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी मागील अनेक वर्षापासून सुरू ठेवलेल्या प्रयत्नाला आता यश मिळत असल्याचे निश्चित झाले आहे.
नांदेड येथे दुसरे विभागीय आयुक्त कार्यालय सुरू करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड हे मागील अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. नांदेड येथे महसूल आयुक्तालय सुरू करावे ही मागणी प्रलंबित असून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने नांदेड येथे दुसरे विभागीय कार्यालय चालू करण्यासाठी दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी आदेश दिले होते.
राज्य शासनाच्या आदेशाने (औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त यांनी नांदेड येथे नवीन विभागीय आयुक्त कार्यालय निर्माण करण्यासंदर्भात प्राप्त प्रारूप आधीसूचनेचे अनुषंगाने अधिसूचनेत नमूद केलेल्या विहित कालावधीत जनतेकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकती बाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आणि लवकरच आयुक्तालय सुरू करावे असे आदेश दिले होते.
अगदी शेवटच्या टप्प्यात ही मागणी असताना अद्यापपर्यंत या मागणीला त्या काळातील सरकारने गांभीर्याने घेतले नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना या मागणीचे निवेदन दिले होते. या मागणीसाठी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. तत्कालीन महसूल मंत्री यांनाही या मागणीसाठी निवेदन देऊन हे कार्यलय सुरू करावे अशी मागणी केली होती.
दुसऱ्या महसूल आयुक्तालय कार्यालयासाठी नांदेड हे सर्व सोयीचे असून परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यासाठी दळणवळणाच्या सोयीने हे शहर मध्यभागी आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथे विमानतळ असून विमानसेवेने हे शहर देशभर जोडले गेले आहे. श्रीक्षेत्र माहूर , सचखंड गुरुद्वारा आदी ऐतिहासिक बाबीसाठी प्रसिद्ध असलेले शहर रेल्वेच्या जाळ्यांनी संपूर्ण देशात जोडले गेले आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या ही इतर जिल्ह्यापेक्षा जास्त असून महसूल कार्यालयाची या जिल्ह्याला व लगतच्या जिल्ह्यांना अतिशय आवश्यकता आहे. तब्बल सोळा तालुक्याचा मोठा जिल्हा व जवळपासच्या जिल्ह्यांसाठी हे शहर मध्यभागी असताना या मागणीकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत नसल्याने नारायण गायकवाड यांनी लोकायुक्त यांचेकडे ही मागणी रेटून धरली होती.
यावर लोकायुक्त यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणी घेऊन दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सदरील विभागीय महसूल कार्यालय येत्या तीन महिन्यांत नांदेड येथे सुरू करावे असे राज्य सरकारला आदेशित केले आहे. लोकायुक्त यांनी हा निर्णय देताना दिनांक 2 जानेवारी 2015 च्या (औरंगाबाद) छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे नांदेड येथे महसूल कार्यालय सुरू करण्याच्या हालचालीना वेग येणार असून सामजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी सुरू ठेवलेल्या सततच्या प्रयत्नाला यश मिळत असल्याचे निश्चित झाले आहे.