नायगाव, रामप्रसाद चन्नावार। अंतरवली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा म्हणून वजिरगाव येथे एका तरुणाने तर नायगाव तहसील कार्यालयासमोर दोन तरुणांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र वजिरगावच्या उपोषणार्थीची प्रकृती खालावली असल्याने जागेवरच उपचार सुरु करण्यात आले आहेत. तीन दिवसापासून उपोषण सुरु असतांना महसूल विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही अमरण उपोषणाला मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असून. प्रशासनाने या दोन्ही उपोषणाकडे पाठ फिरवल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून. तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वजिरगाव येथील उपोषणकर्ते हनमंत ढगे यांची प्रकृती खालावत चालल्याने पोलीस अधिकारी उपोषण स्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. पण तहसील कार्यालयाचा एकही जबाबदार अधिकारी उपोषण स्थळाकडे फिरकले नाहीत. तहसीलदार मंजुषा भगत या रजेवर आहेत तर दुसरे नायब तहसीलदार प्रशिक्षणासाठी गेले असल्याने नायगाव तहसीलचा कारभार एकाच नायब तहसीलदाराव सुरु आहे.
ज्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी आहे त्या विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपोषण स्थळाकडे फिरकला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी बिलोलीचे प्रभारी उप विभागीय अधिकारी तहसीलदार श्रीकांत निळे यांनी वजिरगाव येथे जावून उपोषणाकर्त्याची भेट घेतली व आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वैद्यकीय सेवेसाठी पथक ठेवले आहे.
वजिरगाव येथील उपोषणकर्ते हनमंत ढगे यांची प्रकृती खालावल्याने सलाईन लावण्यात आले. असून वैद्यकीय पथक सतर्क आहे.तहसीलदार मंजुषा भगत या शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वजिरगाव येथील उपोषण स्थळी येण्याचा शब्द देवूनही आले नसल्याने नागरिक आक्रमक झाले होते. याचा फटका नायब तहसीलदार देवराये यांना बसला असून कार्यकर्त्यांच्या रागाचा सामना करावा लागला.