जालना/अंतरवाली सराटी। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे मागील दोन आठवड्या पासून सुरु आहे.
एक सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक मुंबई मध्ये सुरु असताना आणि त्या बैठकीस २६ पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असताना जाणीवपूर्वक जरांगे पाटलांचे उपोषण चिरडण्याच्या उद्देशाने पोलिसांमार्फत उपोषणार्थीणा आणि पाठिंबा देण्यासाठी आलेल्या समर्थकांना हुसकावून लावण्यासाठी बळाचा वापर करून बेछुट लाठीचार्ज केला आणि सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा फज्जा उडू नये म्हणून लाखोंचे मोर्चे काढणाऱ्या व एक शांततेचा आदर्श निर्माण करणाऱ्या मराठा समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र शिंदे – फडणवीस – पवार सरकारला चांगलेच महागात पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलने,मोर्चे मोठ्या प्रमाणात निघत आहेत किंबहुना अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणास वाढता पाठिंबा पाहता शासन आणि प्रशासनाच्या विरोधात सामान्य जनमानसात तीव्र निषेधार्ह भावना निर्माण होत आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने घोषित केल्याप्रमाणे दि.८ सप्टेंबर रोजी पक्षाचे राज्य सचिव प्रा.कॉ.डॉ. उदय नारकर यांच्या नेतृवाखाली पक्षाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट दिली. जरांगे पाटलांच्या उपोषणास पाठिंबा देत मराठा समाजाला आरक्षण देण्या संदर्भात पक्षाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रा.कॉ.उदय नारकर यांनी आपल्या मनोगतात उपस्थित लोक आणि प्रसार माध्यमा समोर मांडल्या. पन्नास टक्के आरक्षणाला धक्का न लावता संसदेचे तातडीने अधिवेशन घेऊन घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे असे कॉ.नारकर म्हणाले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य सचिव मंडळ सभासद तथा मराठवाड्याचे निमंत्रक कॉ. विजय गाभने (नांदेड), जेष्ठ नेते तथा राज्य कमिटी सभासद कॉ. पी.एस.घाडगे (बीड) राज्य कमिटी सभासद कॉ.भगवान भोजने (औरंगाबाद) कॉ.उद्धव पोळ (परभणी) कॉ.अजय बुरांडे (बीड) कॉ.मारोती खंदारे (जालना) जिल्हा कमिटी सचिव मंडळ सभासद कॉ.उज्वला पडलवार (नांदेड )जिल्हा कमिटी सभासद कॉ.लक्ष्मण साक्रूडकर, कॉ.दिपक लिपने, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.भाऊसाहेब झिरपे, कॉ.अनिल मिसाळ, कॉ.दत्ता डाके,कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ. मंगलताई ठोंबरे, कॉ.दत्तूसिंग ठाकूर, कॉ.कल्याण जाधव यांच्यासह मराठवाड्यातून ६० ते ७० प्रमुख कार्यकर्ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देत आहे असे कॉ.नारकर यांनी अंतरवाली सराटी येथे स्पष्ट केले.