देवानं पोट का बरं दिलं असेल …भूक लागलीच नसती तर काही कामच करण्याची गरज पडली नसती का? असे अनेक प्रश्नच उपस्थित झाले नसते ज्यांना दोन वेळचे अन्न सहजरीत्या उपलब्ध होते. तुम्ही आम्ही सर्वजण पोट भरण्यासाठी राब राब राबतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्नधान्याच्या किंमती व उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत असल्याने ग्रामीण भागात विशेषतः गोरगरिबांना अन्नधान्याच्या किंमतीबद्दल खूप सहानुभूती असते. नेमकी हीच बाब हेरून मराठवाड्यात कमी पैशात जास्त अन्नधान्य देण्याच्या नांवाखाली अन्नदाता सेवा केंद्र थाटून मराठवाड्यातील नांदेड , हिंगोली, परभणी, जालना एवढेच नव्हे तर अहमदनगरपर्यंत फसवणुकीचे जाळे उभारणाऱ्या एका टोळीला नुकतीच मराठवाड्यात अटक करण्यात आली. गोरगरीब व मध्यमवर्गीयांची फसवणूक करत किमान शंभर कोटी रुपये या टोळीने लाटल्याचे प्राथमिक तपासात सिद्ध झाले आहे.
राज्य शासनाकडून गोरगरीब लोकांसाठी कमी किंमतीत अन्नधान्य तसेच दुचाकी व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू देण्यात येत असल्याचे आमिष दाखविणारी ही टोळी नुकतीच जेरबंद झाली आहे. या टोळीने मराठवाड्यातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. नांदेडमधील तरोडा भागात छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र या नावाने काहीजणांनी कार्यालय थाटले. सदरील संस्था राज्य शासनाच्यावतीने चालविण्यात येत असल्याचे आमिष गोरगरिबांना दाखविण्यात आले. गोरगरिबांसाठी माफक दरात अन्नधान्य व दुचाकी तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्यात येणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशांची लुबाडणूक करण्यात आली.
अकराशे रुपये भरल्यास ३० किलो गहू ,२५ किलो तांदूळ , दहा किलो साखर, दहा किलो पोहे , पाच किलो शेंगदाणे तर बाराशे रुपयांमध्ये ६० किलो गहू , २५ किलो तांदूळ तसेच तीन हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कुटी, बावीसशे रुपयांत शिलाई मशीन व सायकल तसेच लॅपटॉप दिले जाईल, असे या संस्थेकडून सुरुवातीला सांगण्यात आले. तसेच विधवा महिलांसाठी बाराशे रुपये भरल्यावर एक वर्ष प्रति महिना दहा हजार रुपये पेन्शन योजना देण्याचे आमिषहि दाखविण्यात आले होते. सर्वसामान्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी या संस्थेकडून काही एजंटची नेमणूक करण्यात आली .
या एजंटांना संस्थेचे जनसंपर्क अधिकारी या गोंडस नावाने नियुक्त करण्यात आले. कोट्यवधी रुपयांची ठेवी जमा झाल्यानंतर सुरुवातीला काही लाभार्थ्यांना अन्नधान्य तसेच दुचाकी वाटप करण्यात आले. दरम्यान लोकांचा विश्वास बसल्याने ठेविदारांची संख्या हजारोंच्या घरात गेली. सुरुवातीला गल्लीबोळ्यापर्यंत असलेला हा अन्नधान्याचा प्रचार नांदेड , परभणी , जालना , हिंगोली या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला.
केवळ गोरगरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय लोकांनाही कमी पैशात अन्नधान्य मिळत असल्याचा मोह आवरला नाही. सुरुवातीच्या काळात गावाच्या बाहेर ट्रक उभा करून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. ज्यावेळी एजंट लोकांनी जमा केलेले ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये संस्थेच्या संबंधितांकडे जमा झाले त्यानंतर मात्र संबंधित टोळीने स्वतःचे बस्तान अन्यत्र नेले. त्यानंतर संस्थेचा संस्थापक बाबासाहेब सातोरे या म्होरक्याने तसेच त्यांच्या कार्यालयातील अन्य जणांनी अन्नधान्य देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली.
काही एजंटांकडे तर बाबासाहेब सातोरे याने सरळ हात वर करून उलट जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व बोगसगिरी आणि फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर अनिल पाईकराव या व्यक्तीने नांदेड मधील वजीराबाद पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यावरून या संस्थेचा म्होरक्या व इतर आठ पुरुष व तीन महिलांविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ४०६, ४०९, १२० (ब ),५०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीच्या या गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली . त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अन्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शासनाच्या नावावर फसवणूक करून या टोळीने १०० कोटींच्यावर रक्कम जमविली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी संबंधित संस्थेने ७०० एजंट नेमले होते. या एजंटला विशिष्ट कमिशन दिले जायचे. त्या माध्यमातून त्यांनी हजारो सदस्य बनविल्याने हा आकडा १०० कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. पोलिसांनी ज्यावेळी कार्यालयावर धाड टाकली त्यामध्ये त्यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. योजनेचे अर्ज , पावत्या, जमा झालेल्या रकमेचा हिशेब, एजंटाकडून आणलेले पैसे आणि वाटपाचा हिशेब आधी दस्तावेज पाहून पोलीसही चक्रावून गेले. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या या गोरख धंद्याचे नेटवर्क नांदेड पुरतेच मर्यादित नाही.
जालना, हिंगोली ,लातूर यासह अहमदनगर जिल्ह्यातही या एजंटांच्या माध्यमातून सभासद नोंदणी झालेली आहे. फसवणूक झालेल्या सभासदांनी आपापल्या जिल्ह्यात गुन्हे दाखल केल्यास यामधील बरेच काही समोर येऊ शकते, असा विश्वास पोलिसांना वाटत आहे. संस्थेकडे जमा झालेल्या पैशातून बाबासाहेब सातोरे व अन्य काही जणांनी ते पैसे प्लॉटिंगमध्ये गुंतविण्याचे समोर आले आहे . या योजनेचा मास्टरमाइंड असलेला सुतारे यांनी औंढा नागनाथ या धार्मिक क्षेत्रानजीक मोठी शेती घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान संस्थेच्या नावाने तसेच वैयक्तिकरित्या काढलेले एका बँकेचे खाते सील करण्यात आले असून ४० लाख रुपयांची रक्कम बँकेत आढळून आली आहे. सुरुवातीला अल्पदरात अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. सदरील अन्नधान्य रेशनचे आहे की काय ? त्यांना अन्नधान्य पुरवठा करणारा कोण ? याचा तपास पोलीस घेत आहेत.
ट्रक द्वारे मागविण्यात आलेले अन्नधान्य लाखो रुपयांचे असल्याने हा व्यवहार रोख स्वरूपात करण्यात आला की बँकेच्या मार्फत करण्यात आला , याचा देखील तपास पोलीस करत आहेत. प्रत्येक जण कमी पैशात चांगली वस्तू मिळते का याचाच शोध घेत असतात. मग अशा विविध योजनांच्या नावाखाली गोरगरिबांना व मध्यमवर्गीयांना फसवणारी टोळी समोर येते. यापूर्वीही अशा अनेक डोळ्यांनी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हैदोस घातला होता. सुरुवातीला छोटीशी वाटणारी रक्कम जेव्हा अनेकांकडून जमा केली जाते त्यावेळी तो आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात जातो. छोट्या छोट्या आमिशांना बळी पडून सर्वसामान्य नागरिक मेताकुटीस आला आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला एका घरात अन्नधान्य आल्यानंतर त्याच घरातील पती-पत्नी , बहिण भाऊ , आई- मुलगा अशा एकाच घरातून अनेकांनी या संस्थेचे सभासदत्व स्वीकारून स्वतःची फसवणूक करून घेतली.फसवणूक करणाऱ्या कांहींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी उद्या त्यांना कदाचित शिक्षाही होईल .परंतु ज्या नागरिकांनी खरंच पोटाला चिमटे घेऊन अकराशे रुपये भरले त्यांना तर पुढे धान्य मिळणार नाही. वर्षभरापासून सुरू असलेला हा प्रकार खरोखरच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला किंवा पोलीस कर्मचाऱ्याला लक्षात आला नसेल काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
…..डॉ. अभयकुमार दांडगेम,,राठवाडा वार्तापत्र,a bhaydandage@gmail.com