नांदेड। राज्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्च्याच्या नियोजनाची बैठक आज नांदेड येथे संपन्न झाली. राज्यातील सरकार केवळ राजकीय वादात गुरफटून गेले असून त्यांचे या राज्यातील शेतकरी, शेतमजूर व गरीब कामगार यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष राहिले नाही.
राज्यातील शेतकऱ्यावर अस्मानी संकटाबरोबरच सरकारच्या सुलतानी संकटाचे मोठे सावट आहे. उशिरा झालेला पाऊस, त्यानंतर पडलेली दीर्घ उघडीप या निसर्गाच्या जीवघेण्या खेळीमुळे राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. पावसाळा संपत आला तरी शेतीसाठी आवश्यक असणारा पाऊस अद्याप राज्यातील सर्वच भागात पडला नाही. हाताला आलेली पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. हातची खरीप पिके गेली आहेत. त्याचबरोबर पाणीच नसल्याने रब्बी पिकं घेता येणार नाहीत. राज्यातील अनेक धरणात आणखीही पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा असावा तेवढा उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच गुराढोरांच्या पाण्याचा व त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
मात्र सत्तेत असणारे व सत्य बाहेर असणारे प्रस्थापित राजकीय पक्ष राजकीय पाठशिवणीचा खेळ खेळण्यात मशगुल आहेत. हैराण झालेल्या राज्यातील जनतेसमोर दुष्काळाचे मोठे संकट तोंड वासून उभे आहे, मात्र या गंभीर बाबीकडे राज्य सरकारचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही, अथवा याबाबत सरकार गंभीर नाही, त्यामुळे सरकारचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व राज्यातील जनतेचा जगण्या मरण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर (( औरंगाबाद) येथे होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चात राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. आज नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीचे विभागीय कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाट, विभागीय प्रशिक्षण प्रमुख प्रा. डॉ. सुरेश शेळके, विभागीय सदस्य डॉक्टर संघरत्न कुरे, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, डॉक्टर राजेश्वर हत्तीआंबिरे, महिला जिल्हा अध्यक्षा निरंजनाताई आवटे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कामगार आघाडीचे केशव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीला नांदेड जिल्हा दक्षिण व उत्तर विभागातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.