हिमायतनगर। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्काळ मराठा आरक्षण लागू करावे या मागणीसासाठी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ग्रामपंचायत व सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हिमायतनगर शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा शेतकरी कुणबी असल्याचे पुरावे वेळोवेळी सादर करण्यात येऊन सुद्धा हेतू पुरस्सर मराठा आरक्षणाला बगल दिली जात आहे. ही दिरंगाई आता या पूढे खपवून घेतली जाणार नाही. जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीच्या आत मराठा आरक्षण लागू करावे अन्यथा मराठा समाजाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. आरक्षण मिळे पर्यन्त कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करण्याची शपथ यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली.