नांदेड। सत्य शोधक विचारमंच ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करते. या संस्थेद्वारा आयोजित आंबेडकरी विचारवेध परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे रविंद्र संगनवार यांना सत्य शोधक समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून 19 सप्टेंबर 2023 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
आंबेडकरोेत्तर चळवळीच्या इतिहासात आपली वेगळी ओळख आणि अमिट ठस्सा उमटविणार्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने नांदेडनगरीत दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय आंबेडकरी विचारवेध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दलित पँथरचे सहसंस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मा. ज. वि. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार्या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते होणार आहे. सदरील परिषदेचे अध्यक्षपद हे सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत इंजि. राहुल वानखेडे (नागपूर) हे भूषविणार आहेत.
यानिमित्ताने पत्रकारिता क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनिय कार्य करणारे दै. जयभारतचे संपादक व माजी महानगर कार्याध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे रविंद्र संगनवार यांना सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल मित्रमंडळी, नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.