नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यांमध्ये सध्या लम्पी (Lumpy) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून या रोगापासून निरोगी जनावरांचा बचाव करण्यासाठी पोळा सणानिमित्त गोवर्गीय पशुधनांना एकत्र आणू नये तसेच तालुक्यतील सर्व गावातील पशुपालक,शेतकरी यांनी घरगुती पद्धतीने पोळा साजरा करावा असं आवाहन तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे.
नुकतेच तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्सव असलेला “पोळा” यंदा साधेपणानेच साजरा होणार हे निश्चित आहे.पोळ्याचा सण दरवर्षी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतकऱ्यांकडून आपापल्या बैलांना सजवून त्याची गावभर सार्वजनिक मिरवणूक काढली जाते.मात्र सर्व तालुक्यातील १९७ इपीसेंटर मध्ये गोवर्गिय पशुधन हे लम्पी या संसर्गिक रोगाने बाधित झाले आहे.
तसेच अशा पशुधनामध्ये मर्तूकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याचे दिसून येत असल्याने इतर निरोगी जनावरांना या संसर्गिक रोगाची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंध म्हणून गुरुवार दि.१४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या पोळा या सणाच्या दिवशी बैलांना,गोऱ्याना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.