नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ हा दि. १२ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे संपन्न होणार आहे. या युवक महोत्सवामध्ये यावर्षीपासून ‘मेहंदी’ व ‘कथाकथन’ या दोन नवीन कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. आता या महोत्सवात एकूण ३० कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
युवक महोत्सवामध्ये ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम: लढा स्वातंत्र्याचा, गाथा बलिदानाची’ हा विषय शोभायात्रेसाठी ठेवण्यात आला आहे. ‘एक देश एक निवडणूक हे धोरण योग्य/अयोग्य’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेसाठी ठेवलेला आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी १) लोकराजा राजर्षी शाहू महाराज, २) महाराष्ट्राचा रहाटगाडा पुढे नेतो मराठवाडा, ३) राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२०, ४) आत्मनिर्भर भारत हे विषय ठेवण्यात आलेले आहेत.
तसेच संगीतकला, ललित कला, वाड्मय कला, लोकनृत्य व आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, नाटक, एकांकिका, नक्कल तसेच प्रबोधनात्मक जलसा इत्यादी कलाप्रकारांचे विद्यार्थी कलावंतांना परिपूर्ण ज्ञान व्हावे व त्यांना या महोत्सवात नियोजित वेळेत अचूक सादरीकरण करता यावे, यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ११:०० वा. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रामधील सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुखांना या कार्यशाळेसाठी पाठवून सहकार्य करावे. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले आहे.