भोकर,गंगाधर पडवळे | तालुक्यातील सोमठाणा ते पाळज रस्त्यावरील देवठाणा शिवारात जागरुक गोरक्षकांनी बैल पोळ्याच्या दिवशीच पहाटे कत्तलीसाठी गोवंश नेत असलेला ट्रक देवठाणा शिवारात पकडला व भोकर पोलीसांच्या स्वाधीन केला.सदरील ट्रकमध्ये जवळपास २२ गोवंश असल्याची गंभीर बाब समोर आली असून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात गोवंश नेत असलेले आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. तर सदरील गोवंशाना मौ.वाकद ता.भोकर येथील गोशाळेत सुरक्षितरित्या सोडण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलिसांत सुरु आहे.
बुधवार दि.१३ सप्टेंबर रोजी पांडूरणा ता.भोकर येथून दोन गाई चोरुन नेत असल्याची घटना ताजी असतांनाच दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी बैल पोळ्याच्या दिवशी पहाटे ४:३० वाजताच्या दरम्यान जागरुक गोरक्षकांनी सोमठाणा ते पाळज रस्त्यावरील मौ.देवठाणा ते मसलगा शिवारात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असलेला ट्रक क्र.एम.एच.४० एन.७५१७ पकडला.तसेच ११२ क्रमांक डायल करून भोकर पोलीसांना याबाबदची माहिती देण्यात आली.त्यावरुन पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,पो.उप.नि.विकास आडे,सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे,जमादार भिमराव जाधव,जमादार नामदेव जाधव,पो.का.चंद्रकांत अरकिलवाड,गृहरक्षक ढगे, जाधव,यांसह आदींचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहचला.दरम्यानच्या काळात घटनास्थळी गोरक्षकांचा मोठा जमाव जमत असल्याचे पाहून गोवंशाने भरलेला तो ट्रक सोडून गोवंश तस्कर व चालकाने तेथून पलायन केले.
सदरील रस्त्याने तेलंगणा राज्यात अनेकवेळा कत्तलीसाठी गोवंश नेल्या जात असल्याची चर्चा उपस्थितांत होत होती.यावेळी देखील दोन ट्रक जात होते अशी माहिती समोर येत असून पकडण्यात आलेल्या ट्रकचे टायर पंचर झाल्याने हे गोवंश सुदैवाने बचावले आहे.महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्त्या प्रतिबंधीत कायदा लागू आहे.परंतू तेलंगणा राज्यात कदाचित तसे नसल्याने भोकर मार्गे तेलंगणा राज्यात सर्रासपणे गोवंश नेल्या जात असल्याची खळबळजनक बाब समोर येत असून गोवंश तस्करांना कायद्याची भिती नसल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात सर्वत्र बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच काबाडकष्ट करून सर्वांच्या मुखी घास भरवणारे शेतकऱ्यांचे हे मित्र सर्जा राजा मात्र कत्तलीसाठी जात असतांना गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने बचावले आहेत.सदरील गोवंशाना मौ.वाकद येथील गोशाळेत सुरक्षिरित्या सोडण्यात आले असून पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलीसात सुरु होती.