नांदेड। शहरातील पूरग्रस्तांनी युनियन मार्फत पाठपुरावा करून मदतीसाठी प्रयत्न केले आणि शासनाने मदत जाहीर करून पैसे पाठविले. मात्र अद्यापही पूरग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे पुरे झाली आता पूरग्रस्तांची थट्टा, देऊन टाका मंजूर झालेले दहा हजार रुपये आणि ५० किलो अन्न धान्याचा कट्टा.. नाहीतर ” सीटू ” देणार २० सप्टेंबरला आंदोलनाचा रट्टा असा इशारा कॉम्रेड गायकवाड यांनी दिला आहे. तसेच २० सप्टेंबर रोज बुधवारी सर्व अर्ज केलेल्या पूरग्रस्तांनी अर्जाची आणि बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन तहसील कार्यालय नांदेड येथे सकाळी ११:३० वाजता यावे असे आवाहनही केला आहे.
यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातील झालेल्या अतिवृष्टीने हैराण झालेल्या नांदेड शहरातील पूरग्रस्तांना ५ सप्टेंबर रोज मंगळवार पासून बँक पासबुक महापालिका येथे जमा केले. २८ ऑगस्ट रोजी हजारो पूरग्रस्तांनी सीटूच्या नेतृवाखाली महापालिका येथे सत्याग्रह आंदोलन केले. १४ ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन होणार होते परंतु जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी जमावबंदी आदेश जारी केल्याने आंदोलनास स्थगीती दिली. ३ ऑगस्ट रोजी दीड ते दोन हजार पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय उपोषण केले.
३१ जुलै रोजी महापालिका येथे सीटू संलग्न मजदूर युनियन मार्फत अर्जदार आणि युनियन अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव,पोलीस अधीक्षक यांच्यासह नांदेडचे आमदार – खासदार आदींना रीतसर निवेदने दिली. २८ ऑगस्ट रोजी पुर्व सूचनेची जिल्हास्तरीय सर्व संबंधित कार्यालयाना नोटीस देऊन माहिती दिली.
महापालिकेनी केलेली टोलवाटोलवी व आमचा काही संबंध नाही असे दाखविण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न हाणून पाडला. सीटूच्या आंदोलनास यश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहा हजार रुपये मंजूर केल्याची मुंबई मंत्रालयातून घोषणा झाली. लोकप्रतिनिधी आणि सत्ताधार्ऱ्यांचा श्रेय लाटण्यासाठी आटापिटा केला गेला. पैसे येऊन जुने झालेत आणि नऊ कोटी चर्चे मधून गायब होण्याच्या तयारीत आहेत, तरीपण जिल्हा प्रशासन पैसे पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास उदासीन दिसते आहे.
शासनाच्या निर्देशनुसार पूरग्रस्तांनी बँक पासबुक सादर केले आणि अर्जदार पूरग्रस्तांची यादी देखील निश्चित झाली. युनियनने अर्जदारांची व बँक पासबुक जमा करणाऱ्यांची यादी महापालिकेस निवेदन देऊन मागितली आणि नाव निहाय माहिती जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नांदेड यांना देण्यात यावे असे लेखी कळविले.
पंचनामा करण्यात भेदभाव करणाऱ्या व खोटी माहिती शासनास देणाऱ्या महापालिकेच्या वसुली अधिकारी आणि तलाठी यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी युनियनने सातत्याने प्रशासनाकडे केली आहे.२६-२७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये नांदेड शहरातील गोरगरीब, मजूर, कामगार आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या घरात पुराच्या पावसाचे पाणी शिरून त्यांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले होते.
सीटू संलग्न मजदूर युनियन कामगार संघटनेने शहरातील अनेक भागात संघटनेचे सभासद असलेल्या परिसरात सर्वेक्षण करून वरील तारखे प्रमाणे पाठपुरावा आणि आंदोलने केली आहेत. दोन महिने पूर्ण होत असून किमान गौरी गणपती सण तरी चांगला व्हावा म्हणून सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी प्रशासनास हा शेवटचा आणि निर्वानीचा इशारा निवेदनाद्वारे दि.११सप्टेंबर रोजी दिला आहे.
पूरग्रस्तांचे आंदोलन हे शेवटचे आणि ” करो या मरो “ची परचिती दर्शविणारे आंदोलन असणार आहे.मंजूर झालेले रुपये दहा हजार जोपर्यंत बँक खात्यात जमा होत नाहीत व पन्नास किलो अन्न धान्य किट मिळणार नाही तोपर्यंत उपोषण आणि धरणे संपणार नाही असे प्रशासनास स्पष्टपणे कळविले आहे. दि.२० सप्टेंबर रोज बुधवार सकाळी ११ वाजता पासून तहसील कार्यालय नांदेड येथे होणाऱ्या बेमुद्दत उपोषण व धरणे आंदोलनात सर्व पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या नागरिकांनी संपूर्ण तयारीने सामील व्हावे तसेच येतेवेळी युनियनच्या वतीने भरलेल्या फॉर्मची व बँक पासबुकची झेरॉक्स (सत्यप्रत) सोबत आणावी असे आवाहन सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.