नांदेड। दलित पॅन्थर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने आंबेडकरी विचारवेध परिषदेच्या वतीने सन २०२३ चे पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड तालुका सचिव आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) चे जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांची निवड चळवळीतील पॅन्थर या पुरस्कारासाठी झाली असून त्यांच्यावर सदिच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कॉ.गायकवाड यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यापूर्वी देखील विविध नामवंत संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.१९ सप्टेंबर रोजी कुसुम सभागृह, नांदेड येथे वेळ सकाळी ११:०० ते ४:०० यावेळेत संपन्न होणार आहे. हा पुरस्कार दलित पॅन्थर चे सह संस्थापक ज.वि.पवार, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत इंजि.राहुल वानखेडे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार आहे.
अशी माहिती सत्यशोधक विचारमंच आणि फुले आंबेडकरी विचारधारा नांदेड द्वारा मनोहर पवार,एन.डी. गवळे,सुरेश हटकर, डॉ.साहेबराव ढवळे,श्रावण नरवाडे,कोंडदेव हटकर,प्रज्ञाधर ढवळे,राज गोडबोले,चंद्रमणी भरणे आदी पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कामगार चळवळीतील आणि सीटूच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या वतीने राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी केले आहे.