नांदेड। राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टी बी पेशंट उपक्रमात क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना मोफत पोषण आहार देण्यात येत असून यासाठी क्षयरोगाचा उपचार घेत असलेल्या व संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार ‘ फुड बास्केट ‘ व इतर आवश्यक मदत ज्यांना द्यावयाची आहे अशांनी संपर्क करून निश्चय मित्र बनावे असे आवाहन आरोग्य विभाग नांदेड तर्फे करण्यात आले आहे .
जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेडच्या माध्यमातून कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट उपक्रमा अंतर्गत उपचार घेत असलेल्या व संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी , दानशूर व्यक्तिमत्व ,उद्योग समूह, बँक व विविध संस्था आदींच्या माध्यमातून निक्षय मित्र संबंधितास बनवून यांच्या सढळ हस्ते फूड बास्केट म्हणून एका क्षयरुग्णास एक महिन्यासाठी पूरक पोषण आहार ज्यात गहू तीन किलो, शेंगदाणे अर्धा किलो, गूळ एक किलो, तेल एक किलो, तांदूळ तीन किलो, मटकी एक किलो व मूग एक किलो द्यावयाचे असते जेणेकरून औषधोपचार घेत असताना त्यास योग्य तो पोषण आहार भेटावा व तो क्षय मुक्त व्हावा.
या हेतूने फुड बास्केट तयार करण्यात आलेली असून या उपक्रमात अधिकाधिक व्यक्तींनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आजच्या एक दिवसीय मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी, डॉ सौ नीना बोराडे, डॉ. सौ .विद्या झिने ,डॉ संगीता गादेवाड , डॉ मिरदुडे आदी अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षय रुग्णांना योग्य तो पोषण आहार देण्यासाठी विशेष एक दिवसीय मोहीम हाती घेण्यात आलेली असून, यासाठी प्रत्येक तालुका स्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी अथवा वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करून सदर मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
नुकतीच पुणे येथे क्षयरोग विभागाची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेत लातूर विभागीय परिमंडळा अंतर्गत टीबी मुक्त पंचायत उपक्रमाचे योग्यरित्या सनियंत्रण व मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विभागीय सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी नांदेड डॉ सतीश कोपुरवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे डॉ.सुनिता गोल्हाईत सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी कळविले आहे . क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी व निक्षयमित्र बनण्यासाठी संबंधितांनी जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेड येथे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.खाजा मैनोद्दीन ९४०५९१५०७१ या भ्रमणध्वनी वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .