३५ हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीतून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून नंतर त्याचा खून केल्याची घटना परभणी जिल्ह्यात उघडकीस आली. व्यवहार कोणाचा …जीव कुणाचा … याचेही भान आरोपीने ठेवले नाही . ही घटना मनाला हेलावून टाकणारी आहे. दुसऱ्या एका घटनेतही एका अकरा वर्षीय मुलीला हकनाक जीव गमवावा लागला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली . त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेकडे साधी डेंग्यू तपासणी किट उपलब्ध नव्हती. केवळ ताप आल्यानंतर मुलीला वडिलांनी दवाखान्यात दाखविले . त्यानंतर तिला डेंग्यू झाल्याची शंका आली.
परंतु ज्या ठिकाणी तिला उपचारासाठी दाखल केले त्या शासकीय रुग्णालयात डेंग्यू तपासणी किट नसल्याने वडिलांनी खाजगी प्रयोगशाळेत एन एस वन ही तपासणी केली . त्यानंतर आजाराचे निदान झाले . परंतु तोपर्यंत त्या मुलीच्या प्लेटलेट कमी झाल्याने अखेर तिला जीव गमवावा लागला. डेंग्यूने झालेला मृत्यू नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे दर्शन घडविते. लहान लेकरांच्या या दोन मृत्यूच्या घटना वेगवेगळ्या असल्या तरी या मृत्यू मनाला चटका लावणारे आहेत . बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात खडकपुरा या भागात एका कापड दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दुकान मालकाच्या तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली . या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या बाबतीत घडलेल्या या घटनांमुळे मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे तसेच संपूर्ण मराठवाडा हळहळला आहे.
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ अशी मराठीत एक म्हण आहे. लहान मुलांच्या प्रति सर्वांचीच एक वेगळी भावना असते. स्वतःच्या मुलांच्या बाबतीत तर प्रत्येक पालक हा जागरूक असतो. आपला मुलगा शाळेत जावा , तो चांगला शिकावा, शिकून मोठा व्हावा व स्वतःच्या पायावर उभा राहावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. याच भावनेतून परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेले माटेगाव येथील प्रकाश बोबडे यांनी स्वतःच्या परमेश्वर नावाच्या मुलाला चांगले शिक्षण देण्याची तयारी दर्शविली. माटेगाव हे एक छोटेसे खेडेगाव आहे. त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी मुलाला शिक्षणासाठी ठेवले म्हणजे तो चांगले शिक्षण घेईल या आशेवर परमेश्वरला त्याच्या वडिलांनी परभणी येथील उघडा महादेव परिसरातील एका खाजगी वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवले होते. तो गांधी विद्यालय येथे इयत्ता नववी वर्गात शिकत होता.
गुरुवारी दुपारी तो शाळेतून वसतिगृहाकडे येत असताना दोन अज्ञात दुचाकीवरून आलेल्या इसमांनी त्याचे अपहरण केले. परमेश्वर हा वसतिगृहात परतला नसल्याने तेथील चालकांनी त्याच्या आई-वडिलांना ही बाब कळविली. त्यानंतर त्या मुलाचे वडील प्रकाश बोबडे हे परभणी येथे आले . त्यांनी देखील मुलाचा शोध घेतला . परंतु शेवटी मुलगा कुठेही आढळून न आल्याने त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात गेल्याबरोबर मदत करतील ते पोलीस कुठले . सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. आपल्या काळजाचा तुकडा कुठे गेला ? या प्रश्नाने त्या मुलाचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली होते. पोलिसांनी अखेर त्या मुलाचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन केले. पोलिसांना परमेश्वर काही आढळला नाही परंतु त्याचा मृतदेहच हाती लागला. नांदेड जिल्ह्यात असलेल्या माळाकोळी येथील तळ्यात परमेश्वरला एका दगडाने बांधून मृत अवस्थेत पाण्यात फेकून देण्यात आले होते. परमेश्वरच्या वडिलांना एका अज्ञात मोबाईलवरून काही रुपयांची मागणी करण्यात आली होती .
ती माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी पालम या ठिकाणी मोबाईलचे लोकेशन शोधले .संशयित म्हणून ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले , त्यांची चौकशी केल्यावर त्यांनीच परमेश्वरचा खून केल्याची कबुली दिली. पालम पोलिसांनी या प्रकरणात बालाजी राजाभाऊ चव्हाण (२०) व नरेश संजय जाधव (१८) या दोन गुन्हेगारांना गजाआड केले. पोलिसांनी या प्रकरणात खोलवर तपास केल्यावर असे लक्षात आले की , यामध्ये पैशांचा वाद मोठ्यांचा होता . परंतु जीव चौदा वर्षाच्या एका छोट्या मुलाचा गेला. दीड वर्षांपूर्वी उसने म्हणून मित्रांकडून घेतलेले पैसे परत न केल्याचा राग मनात धरून आरोपी मित्राने पैसे उसने घेतल्याप्रकरणी त्या लहान मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा चिरून जीवे मारले. या घटनेमुळे परभणी व नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बेटमोगरा नावाचे गाव आहे. त्या गावात राहणारी चांदणी गणेश नवलेकर ही अकरा वर्षाची मुलगी आजारी होती . ती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी हलवले . परंतु तिचा नांदेडला उपचारादरम्यान प्लेटलेट कमी झाल्याने मृत्यू झाला. मराठवाड्यातील नांदेड , परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात डेंग्यूची साथ सुरू आहे . आरोग्य यंत्रणेने याकडे गांभीर्याने अद्यापही पाहिलेले नाही.
मुखेडच्याच उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे सात रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आरोग्य अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. ज्या अकरा वर्षीय चांदणी नवलेकर या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला तिला डेंग्यू तपासणी किट वेळेवर न मिळाल्याने तिचा आजार बळावला व त्यामध्येच तिची प्राणज्योत मावळली.
नांदेड जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्र कोमात गेली आहेत. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी केव्हाही येतात. परिचारिका काम उरकून घेत असतात. याकडे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या बोरी या गावातील एकनाथ मारुती जायभाये हा ३२ वर्षीय तरुण भारतीय सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत आहे.तो बिकानेर येथे तो कर्तव्यावर असून सुट्टीसाठी तो गावाकडे आला. १३ सप्टेंबर रोजी पहाटे त्याने स्वतःची गर्भवती पत्नी भाग्यश्री जायभाये व चार वर्षीय मुलगीचा गळा आवळून खून केला. मयत भाग्यश्री हिच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या जवान आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तो पत्नीला माहेरहून घर बांधकाम करण्यासाठी चार लाख रुपये घेऊन ये , म्हणून सारखा तगादा लावत होता. याशिवाय पहिली मुलगी आहे. आता दुसरी मुलगी मला नको आहे, तू गर्भ तपासणी करून घे , असा तगादा त्याने लावला होता . यावरूनच नेहमी दोघांमध्ये वाद व्हायचा व त्यामधून हे हत्याकांड घडले , असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. गर्भवती पत्नीसह चार वर्षीय बालिकेचा गळा दाबून खून करणाऱ्या या घटनेने मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे . सैन्यात असलेल्या पतीचे हे क्रूर कृत्य अतिशय वेदनादायी आहे.
….डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र abhaydandage@gmail.com